पाकिस्तानचं यान – २

March 30, 2020

लेखन

arvind jagapat patra

पाकिस्तानला काय अवदसा आठवली आणि त्यांनी आकाशात यान पाठवलं अशी सगळ्या गावकऱ्यांची चर्चा सुरु होती

 पाकिस्तानला काय अवदसा आठवली आणि त्यांनी आकाशात यान पाठवलं अशी सगळ्या गावकऱ्यांची चर्चा सुरु होती. पण यान आपल्या भागात पडणार आणि आपण एका क्षणात होत्याचे नव्हते होणार याची त्यांना खात्री झाली. उरलेले काही तास जगून घ्यायचं ठरलं. काही लोकांनी आधी अमेरिकेची स्काय lab अशीच पडणार होती याची आठवण काढली. ती समुद्रात पडली म्हणून पाकिस्तानचं यान पण समुद्रात पडेल असं नाही. ते गावातच पडेल अशी खात्रीच असल्यासारखे लोक मजा करायला लागले. पुरणपोळी आणि मटन एकत्र खायला लागले. काही बायकांची बाईकवर बसायची इच्छा होती. ती पूर्ण करून घेतली. कारण आता कुणी कुणाला अडवणार नव्हतं. आणि अडवायचं कशासाठी? जगायचे असे किती तास राहिले होते?

शाळेतल्या पोरांचा निकाल होता. दहावीत असणारी काही पोरं घाबरलेली होती. ती एकदम निर्धास्त झाली. गावात पाच पक्षाचे पाच गट होते. पाच बोर्ड होते. पाच झेंडे होते. आज सगळे पक्षाचे झेंडे लोकांनी फेकून दिले. दुसर्या पक्षाच्या माणसाला एरव्ही रामराम पण न घालणारे लोक एकत्र बसून दारू पीत होते. नाचत होते. आता भांडण करायला काही कारण उरलं नव्हतं. कविता आणि श्रीकांतच्या बाजूने असलेल्या लोकांनी जमा केलेल्या काठ्या आणि तलवारी आता अडगळीत गेल्या होत्या. खूप धमाल करून झाल्यावर अचानक गजाला आठवलं की नाहीतरी आपण मरणार आहोत. कशाला बिचाऱ्या श्रीकांत आणि कविताच तळतळाट घ्यायचा? करायचं त्यांना लग्न तर करू द्या ना. मिल्या पण याच मताचा होता. नाहीतरी सगळ्यांना नुसतच नाचून कंटाळां आला होता. भजनी मंडळ तरी किती वेळ टाळ वाजवणार? आणि पोरं सोरं तरी खेळून खेळून किती क्रिकेट खेळणार? आणि खाऊन खाऊन किती खाणार? शेवटी असं ठरलं की जाता जाता एक चांगलं काम करूया. श्रीकांत आणि कविताचं लग्न लावूया.

सगळ्यांनी तात्याची भेट घेतली. तात्या आधी तयार नव्हते. पण गावातल्या चार शहाण्या माणसांनी समजवून सांगितलं. मरताना आपण काय सोबत घेऊन जाणार? असे नेहमीचे संवाद झाले. आणि जात तरी आपण कुठं सोबत घेऊन जातो असा प्रश्न विचारला. तात्याला लक्षात आलं. आता मरायचंच आहे तर कशाला एवढा ताठा दाखवायचा. आपण खालच्या जातीतला जावई केला हे आता आयुष्यभर कुठं लक्षात ठेवायचंय? नाव ठेवणारे पण आपल्याच सोबत जाणार. आणि जात अशी काय कामी आली? आपण वरच्या जातीतले म्हणून काय यान आपल्याला सोडणार आहे का? मरण जात बघत नाही. रोगराई जात बघत नाही. भूकंप जात बघत नाही. पूर जात बघत नाही. म्हणून असे संकट आले की माणसं माणसासारखे वागायला लागतात. तात्या पण अचानक मोठ्या मनाने लग्नाला तयार झाला. सगळ्या गावाने मिळून मोठ्या धामधुमीत लग्न लावायचं ठरलं. शेवटी हे त्यांच्या डोळ्या देखतचं शेवटचं लग्न ठरणार होतं.

बातमी जशी गावात पोचली तसे सगळे उत्साहात आले. कारण मरण जवळ आलं तरी नेमकं काय करू आणि काय नाही असं सगळ्यांना झालं होतं. आता एक छान कारण मिळालं. एखादा प्रसंग साजरा करायला. मरता मरता लक्षात राहील असं लग्न लावायचं ठरलं. श्रीकांत आणी कविताला खूप आनंद झाला. कधी एकदा भेट होते असं झालं. पण आता गावाने त्यांचा ताबा घेतला होता. सगळ्यात भारी कपडे निवडले गेले. सगळं गाव स्वतः नटून थटून तयार झालं. सगळ्यात भारी नाचणारा घोडा आणला. डीजे बोलवायची गरज नव्हती. ज्याला जे वाजवता येतं ते तो स्वतः वाजवत होता. नाचत होता. गाणं म्हणत होता. मंदिरा पासून मंडपात जायला पाच मिनिट लागतात. पण एक तास झाला तरी नाच संपत नव्हता. श्रीकांत घोड्यावर बसून कंटाळून गेला होता. शेवटी उतरून तो स्वतः नाचायला लागला. गावात पहिल्यांदा बायका आणी पुरुष एकत्र नाचत होते. पहिल्यांदा काही बायका पंजाबी ड्रेस घालून लग्नात आल्या होत्या. घरातले सगळे दागिने अंगावर घालायची पहिलीच वेळ होती सगळ्यांची. होते नव्हते तेवढे फटाके फोडत होते लोक. कविताला आपली इच्छा पूर्ण होतेय याचा खूप आनंद होता. कधी एकदा श्रीकांच्या गळ्यात माळ घालू असं झालं होतं तिला.

नाचून पार थकून गेल्यावर मंडळी मंडपात पोचली. अचानक गोळीबाराचा आवाज आला. सगळे घाबरून गेले. मंगलाष्टक म्हणायच्या तयारीत असलेले भटजी घाबरून गेले. अचानक लक्षात आलं की सदाभाऊने त्याच्याकडे असलेल्या बंदुकीतल्या सगळ्या गोळ्या उडवल्या होत्या. आनंदाच्या भरात. सगळे पुन्हा नॉर्मल झाले. नवरीचा मामा आणि नवरदेवाचा मामा स्टेजवर आले. खरंतर त्यांच्या खऱ्या मामाला बोलवायला वेळ मिळाला नाही म्हणून वेगळेच लोक मामा म्हणून उभे राहिले. वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे लोक आज एकाच मांडवात तर एकत्र आले होते. पण एकाच नात्यात असल्यासारखे वागत होते. भटजीनी माईक हातात घेतला. सुरुवात केली. अचानक गण्या धावत आला. गण्या म्हणजे गावातला रिपोर्टर. तो ज्या पेपर मध्ये काम करायचा तो पेपर कुठं दिसायचा नाही. पण गण्या बातमीच्या शोधात सगळीकडे दिसायचा. सगळ्यात आधी बातमी गण्याकडे असायची. आणि गण्याकडे बातमी नसली तर ती खरी नाही असं वाटायचं लोकांना. आजपण गण्या उत्साहात धावत आला आणी सगळ्यांना धडकी भरली. आता हा नवीन काय सांगतो? गण्याने माईकचा ताबा घेतला. सगळे कान टवकारून ऐकू लागले. गण्या म्हणाला आपण मोठेपणा घेऊन श्रीकांत आणी कविताचं लग्न लावायचं ठरवलं आणि देवानी आपल्यावर कृपा केली. पाकिस्तानचं यान आता दिशा बदलून पाकिस्तानातच पडलं. आपल्यावरचं संकट टळलं. सगळ्यांनी आनंदात एकमेकांना मिठ्या मारल्या. आनंदाच्या भरात पक्यानी शेजारच्या गौरीला मिठी मारली. गौरीनी एक जोरदार थोबाडीत ठेवून दिली आणि पक्या जमिनीवर पडला.

भटजी पुन्हा मंत्र म्हणायला लागले. पण अचानक तात्या स्टेज वर आले आणि सिनेमातल्या सारखे म्हणाले, हे लग्न होणार नाही. सगळे हैराण झाले. अचानक तात्याला काय झालं? पण आता संकट टळल होतं. आता आपली पोरगी खालच्या जातीतल्या मुलाला द्यायला तात्या तयार नव्हते. आता ते पुन्हा आपली प्रतिष्ठा आणी मान जपणार होते. कविता घाबरून गेली होती. श्रीकांत निराश झाला होता. श्रीकांतच्या गोटातले लोक पुन्हा लाठ्या काठ्या शोधू लागले होते. तात्याच्या लोकांना कुणकुण लागल्यावर त्यांनी पण तयारी सुरु केली होती. अचानक गण्याने तात्यांना माईकवरूनच बोलायला सुरुवात केली. गण्या म्हणाला सगळ्या गावात दोघांच्या लग्नाची गोष्ट आता माहित झालीय. लग्न होणार नसलं तरी अशा प्रकारचा सोहळा आपण केला हे लोक काही जन्मभर विसरू शकणार नाहीत. कितीही नाही म्हणालो तरी श्रीकांत आणी कविताला आता लोक नवरा बायको म्हणून ओळखणार. ही भानगड आता लपून राहिलेली नाही. तिचं लग्न जमवताना आता तुम्हाला अडचणी येणार. मानपाना पाई उगच एखाद्या येड्याच्या गळ्यात तिला हार घालायला लावणार. त्याच्यापेक्षा लग्न होऊ द्या. श्रीकांत चांगलं पोरगंय.पोरगी गावात राहील. बाकीच्या ज्येष्ठ लोकांनी पण गण्याच्या सुरात सूर मिसळला आणि तात्या आपली पोरगी श्रीकांतला द्यायला तयार झाले. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. रात्री सगळ्या गावात हीच चर्चा झाली की श्रीकांत आणि कविता सारखं लग्न आपल्या गावात काय पंचक्रोशीत झालं नाही.

तिकडं गावापासून काही किलोमीटर दूर असलेलं दुसरं गाव. मालिका चालू असल्याचा फायदा घेऊन मनी आपल्या प्रियकराला भेटायला शाळेच्या मागे गेली. दोघं चांदण्या बघत एकमेकांच्या मिठीत बसले होते. खूप वेळ शांत बसल्यानंतर अचानक मनी म्हणाली, आपल्या गावातबी पाकिस्तानला एक यान पाठवायला सांगितलं पायजे. म्हणजे आपल्या लग्नाला होणारा इरोध संपल. आपलंबी लग्न धूमधडाक्यात होईल. दुसरा त काही इलाज दिसत नाही. मोठा घात झाल्याशिवाय माणूस जात इसरत नाही.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *