प्रिय महाराष्ट्र
महाराष्ट्रातल्या इतर अनेक गावासारख्याच एका गावाची ही गोष्ट. कधीकाळी आपल्या शेतातल्या भरघोस पिकावर पाखरं येऊ नयेत म्हणून बुजगावणं उभं करायचे लोक. पण गेल्या काही वर्षात गावात बुजगावणं सुद्धा नजरेस पडत नाही. माणसं निघून जातात दुसऱ्यांच्या शेतातला उस तोडायला. गावची वेस ओलांडून जायला फुरसत नव्हती एके काळी. आणि गेल्या काही वर्षात शेकडो किलोमीटर दूर मजुरीसाठी जायला लागली होती माणसं. कारण आभाळ रुसलं होतं. शेतात घाम गाळायला अर्थ वाटत नव्हता. पाउस नसला की हौस पण नसते. कोरड्या विहिरीतले उघडे पडलेले खडक वाकडं दाखवत असल्यासारखे वाटत होते. तरी त्यांच्याशीसुद्धा टक्कर घ्यायची हिंमत दाखवत होते काही लोक. महादेव त्यांच्यातलाच एक. तीन लाख रुपये कर्ज घेऊन त्याने नवीन विहीर बांधली. पण पाणी लागलं नाही. मग लाखभर खर्च करून बोअर घेतला. तो कोरडाच निघाला. बोअर चालू व्हायचं स्वप्न बघणाऱ्या महादेवच्या कर्जाचे हप्ते फक्त चालू राहिले. असे अनेक महादेव होते गावात ज्यांनी नियतीशी लढायचं ठरवलं होतं. पण सतत पराभवच पदरी पडला होता. ही गोष्ट आहे बीडच्या निमला गावची.
निसर्ग कधी कोपत नाही हे माहित असल्यामुळे निमला गाव पुन्हा एकत्र आलं. गावात पुन्हा पाणी आणायचं ठरवलं. tanker ने नाही. कष्टाने. स्वतःच्या घामाने. water कप मध्ये भाग घ्यायचं ठरलं. ग्रामदेवतेची शपथ घेऊन सगळे तयारीला लागले. स्पर्धा सुरु व्हायला दोन दिवस बाकी होते आणि अचानक एक किंचाळी सगळ्यांचं अवसान गाळून गेली. महादेवच्या बायकोने आत्महत्या केली. कर्जवसुलीसाठी येणारे लोक, पुढ काय होणार ही चिंता. एरव्ही सुखा दुक्खात बायकाच असतात एकमेकींच्या मदतीला. एखादीचे हात पाय दुखत असले तर दुसरी सांगते मलापण व्हायचं असं. पण दोन टाईम नीट जेवल की सगळं नीट होतं. हे खोटं असतं. दिलासा द्यायला आणलेलं सोंग असतं. जेंव्हा प्रश्न पैशाचा असतो तेंव्हा पैशाचं सोंग आणता येत नाही. महादेवच्या घरातली दुखःद घटना सगळ्या निमला गावाला निराश करणारी होती. दोन लेकरं सोडून आई निघून गेली. मागच्या काही वर्षात त्या एकाच गावात दहा लोकांनी आत्महत्या केली होती. कसं करणार श्रमदान? स्वप्न पूर्ण करण्यासाठी गोळा व्हायचं होतं. पण अंत्यसंस्काराला गोळा व्हायची वेळ आली. आपल्या स्वप्नाची राख होताना पाहणं आता गावांच्या अंगवळणी पडलंय. पण निमलात असं होणार नव्हतं.
निमला गाव छोटं होतं. गावाला सुतक पडल्यासारखं झालं होतं. स्पर्धा सुरु व्हायला एक दिवस बाकी होता. पण कुणाचं मन नव्हतं आता स्पर्धेत भाग घ्यायचं. महादेवला मात्र हे मान्य नव्हतं. गाव आपला विचार करतय तर आपण पण गावाचा विचार केला पाहिजे. महादेवने गावाला समजवल. आपण रडायचं नाही लढायचं. स्पर्धेत भाग घ्यायचा. महादेव एवढा धीर दाखवतोय हे बघून गाव तर अजून खंबीर झालं. एकत्र आलं. पाणी साठवायला जे जे करता येईल ते करायला सुरुवात झाली. मशीन सोडा कुदळ फावडेसुद्धा कमी होते. पण जिद्द होती. टक्कर द्यायची होती. सगळा जोर लावायचा होता. आज एक वर्ष झालं या गोष्टीला जेंव्हा फक्त घामच सांडत होता निमलाच्या मातीत. बीड जिल्ह्यातल्या या निमला गावी जाऊन बघा. आज तिथं पाणी आहे. प्रत्येक शेतात पिक आहे. एक वर्ष आधी गावातले बहुतेक लोक दुसऱ्यांच्या शेतात उसतोडीला जायचे. गाव ओस पडलेलं असायचं. पण आज निमला आपल्या हक्काच्या शेतात राबतय. मजूर नाही. मालक म्हणून. हे सगळं घडलं ते निसर्गाचं कर्ज कायमचं फेडायचं ठरवलं म्हणून.
प्रत्येक कर्ज बँकेचं नसतं. निसर्गाचं पण कर्ज असतं. गाळ साचलेल्या विहिरी, बुजलेले बारव, आटलेले तलाव हे सगळं कर्ज आहे. आणि हे हप्त्या हप्त्याने आपल्याच नाही येणाऱ्या पिढीचं पण नुकसान करतय. आपण हे कर्ज फेडलं पाहिजे. हे कर्ज फेडण्यात आपला हातभार लागला पाहिजे. लोक नावासाठी काय काय करतात आपण बघतोच. पण पुढची पिढी विचारेल की गावासाठी काय केलं? तेंव्हा आपल्याला पण काहीतरी सांगता आलं पाहिजे. निमल्याचे लोक अभिमानाने सांगतील हे मात्र नक्की. कारण त्यांनी अख्खा गावच बदलून टाकलाय.
0 Comments