पानिपतचा पराभव

December 4, 2019

लेखन

arvind jagapat patra

प्रिय सर्वपक्षीय आमदार साहेब,

प्रिय सर्वपक्षीय आमदार साहेब,

नमस्कार. सुटलो एकदाचे. राजकारणामुळे गेला महिनाभर राज्याला जवळपास व्हेंटिलेटरवर असल्यासारखं वाटत होतं. जे जिंकले त्यांना मनापासून शुभेच्छा. जे हरले त्यांना पुढच्यावेळीसाठी शुभेच्छा. तुम्हाला खरच सांगतो आमदारसाहेब पहिल्यांदा तुमच्यामुळे लोनचे हप्ते विसरलो. लोकलमधली गर्दी विसरलो. रस्त्यावरचे खड्डे विसरलो. महिनाभर फक्त कुठला पक्ष काय करणार, कुठला नेता काय डाव टाकणार एवढ्या एकाच विषयावर बोलत होतो आम्ही. ज्याचं मत बायको विचारत नाही तो राज्यपालांनी काय केलं पाहिजे यावर आपलं मत सांगत होता. जो रोज stop वर बस कधी येते म्हणून वाट पहायचा तो संजय राउत टीव्हीवर कधी येतात म्हणून वाट पाहू लागला. ज्याचं आयुष्य चायनीजच्या गाडीवर बाटलीत क्वार्टर मिक्स करून पिण्यात गेलं तो कोणत्या फाईव स्टार हॉटेल मध्ये किती आमदार आहेत त्याचं गणित करत होता. जे आपल्या काकाला कधी नमस्कार करत नव्हते ते लोकांच्या काकाविषयी दिवस दिवस बोलत होते. ज्यांना आपल्या पगाराचा आकडा अजूनही सांगता येत नाही ते कोणत्या पक्षाकडे किती आमदार आहेत हे सांगत होते. पण खरं सांगू साहेब? सगळेच घाबरले होते. कुणाचाच अंदाज बरोबर येत नव्हता. काय होईल सांगता येत नव्हतं. वरवर विनोद चालू असले तरी जनता हतबल झाली होती. कारण सगळं अंदाज लावण्याच्या पलीकडे गेलं होतं.

राजकारण महाराष्ट्राच्या आवडीचा विषय. पण यावेळी खूप टेन्शन आलं राजकारणामुळे. पुन्हा निवडणूक येते की काय अशी भीती होती. सगळ्याच मोठ्या पक्षांनी जनतेचा विश्वास गमावला होता. पुन्हा मतदान करायचं नाही असं लोक बोलू लागले होते. हे खूप गंभीर आहे. खरतर कुणीतरी जिंकणार आणि कुणीतरी हरणार हे ठरलेलं असतं. पण राज्य कायम जनतेचं असतं. पण गेला महिनाभर यावेळी जनतेला आपला पराभव झाल्यासारखं वाटलं होतं. अमुक पक्ष जिंकला आणि अमुक पक्ष हरला. पण जनतेला मात्र आपलं पानिपत झाल्यासारखं वाटलं काही काळ.

अर्थात पानिपत पराभव असला तरी तो मराठ्यांचा तेवढाच मोठा विजय आहे. कारण सारखा सारखा लूटमार करायला येणारा अब्दाली पुन्हा तोंड घेऊन परत आला नाही. त्याला मराठ्यांनी धडकी भरवली होती. पानिपतला पराभव झाला तरी जीवाची बाजी लावून मराठे लढले याचा आम्हाला अभिमान आहे. आजही. दिल्लीच्या तख्ताला सुरक्षेसाठी मराठ्यांचाच आधार होता. अब्दालीशी दोन हात करण्याची ताकद फक्त मराठयांमध्ये होती. एकेकाळी मराठ्यांचा किती दबदबा होता हे लक्षात घ्या. महाराष्ट्राने देशाला शिवाजी महाराजांच्या रूपाने राजे कसे असावेत, राज्य कसं असावं याचा आदर्श घालून दिलाय. त्या महाराष्ट्रातलं राजकारण देशापुढे नेहमीच आदर्श ठेवणारं राहो ही आमची अपेक्षा आहे.

पानिपतचा पराभव झाला याचं सगळ्यात मोठं कारण आपल्या लोकांमध्ये एकी नव्हती. हे सगळे अभ्यासक सांगतात. एकी नसली की बाहेरचे लोक येऊन धडा शिकवून जातात हे मराठ्यांना कुणी वेगळं सांगायची गरज नाही. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे पानिपतच्या युद्धात बाजारबूनग्यांची संख्या खूप होती. बाजारबुणगे पदरी बाळगू नयेत हा धडा शिकणे गरजेचे आहे. पानिपतच्या पराभवासाठी असंख्य छोटी मोठी कारणं होती. त्यात पत्र वेळेवर न पोचणे, योग्य वेळी मदत न मिळणे अशी पण कारणं होती. आजही या गोष्टी घडताना दिसतात आणि वाईट वाटतं. असं म्हणतात की पानिपतच्या वेळी निसर्गाचा विचार करण्यात थोडी चूक झाली. पावसाचा नीट अंदाज लावता आला नाही. नदीला पूर कधी येईल हे लक्षात घेतलं गेलं नाही. आमदारसाहेब तुम्ही पण निसर्गाचा अंदाज घेण्यात उशीर करता. पुराच्या वेळी यायला तुम्ही उशीर केला. दुष्काळाच्या बाबतीत दुर्लक्ष करता. निसर्गाच्या बाबतीत हयगय युद्धातच नाही निवडणुकीतही महागात पडते हे लक्षात ठेवा.

आमदार साहेब, पानिपतमधल्या आपल्या योद्ध्यांच्या पराक्रमाची आज कुणाकडून अपेक्षासुद्धा नाही. पण निदान त्यांच्या एक दोन चुकांमधून शिकण्याची नक्कीच अपेक्षा आहे. पानिपतची सगळ्यात मोठी गोष्ट ही होती की देशाला महाराष्ट्राकडून सगळ्यात जास्त अपेक्षा होत्या. आज देशाने महाराष्ट्राकडून फक्त सगळ्यात जास्त इन्कमटॅक्सची अपेक्षा करायची का? देशाला पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाची गरज वाटली पाहिजे. राजकारणातच नाही. उद्योगात. सामाजिक कार्यात. एक कार्यकर्ता म्हणून या सगळ्या गोष्टींचं दुखः वाटतं. एका गावात चार चार पक्षाचे चारशे कट्टर कार्यकर्ते. शेजार शेजारच्या घरावर वेगळ्या वेगळ्या पक्षाचे झेंडे. निवडणुकीत एवढे वेगवेगळे झेंडे दिसतात की हा देश एकसंध आहे यावर विश्वासच बसत नाही. म्हणून आपण सगळ्यांनी पानिपतच्या युद्धातून शिकलं पाहिजे. नेत्यांमध्ये संवाद पाहिजे. एकजूट पाहिजे.

पानिपतच्या युद्धात पराभव झाला तरी मराठ्यांनी देशापुढे आदर्श घालून दिला. पानिपतचं युध्द खूप गोष्टी शिकवून जातं. पण आजच्या काळात आपण शिकण्यासारखी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकीचे बळ. नेते एकत्र नसले तरी सामान्य माणसाने एकत्र राहिलच पाहिजे. विश्वासराव पडले म्हणून पानिपतमध्ये सगळी धावपळ उडाली. आपले लोक सैरावैरा पळू लागले. विश्वास गमावणे किती भयंकर असते हे आपण पानिपतमध्ये पाहिलं. पण तेंव्हा विश्वासराव हे फक्त माणसाचं नाव होतं. आज मात्र महाराष्ट्राने राजकारणावरचा विश्वास गमावलाय. पक्षांवरचा विश्वास गमावलाय. जेंव्हा विश्वास गमवला जातो तेंव्हा अर्धा पराभव झालेला असतो. आता पुन्हा लढायची प्रेरणा निर्माण होण्यासाठी आधी सगळ्याच पक्षांना पुन्हा नव्याने विश्वास निर्माण करावा लागेल. पानिपतमध्ये विश्वासरावांचा देह परत मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली होती. तुम्हाला जनतेच्या मनात पुन्हा विश्वास निर्माण करण्यासाठी खूप काही करावं लागेल. पुन्हा पानिपत होऊ द्यायचं नसेल तर विश्वास गमवून चालणार नाही. फक्त राजकीय पक्षांनी नाही तुम्ही आम्ही पण मनावर घेतलं पाहिजे. राजकारणा पलीकडे एकमेकांना पाहिलं पाहिजे. नव्या वाटचालीसाठी सगळ्यांना शुभेच्छा! जय हिंद. जय महाराष्ट्र.
– अरविंद जगताप.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *