फोटो हे गावोगावच्या फोटोग्राफर लोकांचं जगण्याचं साधन होतं. पण मोबाईल आला आणि सगळा गोंधळ झाला. फोटोसाठी जगणारे वाढू लागले. काही लोकांचे सोशलमिडिया प्रोफाईल बघितले की वाटतं, यांचा जन्म फक्त फोटो काढण्यासाठीच झालाय. खूप लोकांना काही गोष्टी डोक्यात क्लिक होतात याचाच विसर पडलाय. त्या फोनच्या कॅमेरात क्लिक करायची धडपड सुरु असते. आता फोटो काढण्यासाठी फोटोग्राफीचं ज्ञान किंवा आवड ही अटच नाही. बटन दाबता येतं तो फोटोग्राफर. पूर्वी कार्यक्रमाचा महत्वाचा भाग असायचा फोटोग्राफर. त्याची आणि लग्न लावणाऱ्या भटजीची तारीख मिळण सारखच अवघड असायचं. त्यात त्याच्याकडून फोटो मिळवण्यासाठी खूप चकरा माराव्या लागायच्या. काही महाभाग तर लग्नाचे फोटो जोडप्याला मुलगा झाल्यावर द्यायचे. बारशाचे फोटो काढायची वेळ आल्यावर. लग्नाच्या फोटोचा अल्बम बघणे हा एक सोहळा होता. आता कित्येक घरात ते वर्षानुवर्ष उघडलेही जात नाहीत. नवरा नवरीने एका बाटलीत दोन स्ट्रॉ टाकून कोल्ड्रिंक पिणे हाच काय तो मॉडर्न फोटो असायचा. पण प्री वेडिंग फोटोग्राफी आली आणि लग्नाचा सिनेमा झाला. फक्त त्यातलं नाट्य हरवलं. काव्य हरवलं. प्री वेडिंग खरतर खूप हळवी गोष्ट असायला हवी होती. पण ती विनोदी होत गेली. एखाद्याला हॉरर सिनेमे आवडतात. एखाद्याला विनोदी सिनेमे आवडतात. आमच्या एका मित्राला प्री वेडिंगचे व्हिडीओ आवडतात. तो पोट धरून हसत असतो ते बघून. त्यात शाहरुखसारखे हावभाव करणारे नवरदेव खूपच केविलवाणे वाटू लागतात. नाशिकला धरणापाशी एका प्री वेडिंगचं शूटिंग चालू होतं. छोट्या बोटीत नवरी उभी. फोटोग्राफर तिला पोझ दाखवत होता. खूप वेळ हात हातात घेऊन फोटोग्राफर आणि नवरी टायटॅनिक चित्रपटातल्या त्या पोझचा सराव करत होते. नवरदेव बघत होता. सात आठ वेळा फोटोग्राफर नवरीचे हात हातात घेऊन तेच करून दाखवे. एका क्षणी नवरदेव संतापला आणि त्याने फोटोग्राफरच्या थोबाडीत मारली. काठावरचे लोक हसून बेजार झाले होते.
कार्यक्रमात फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरचा एक भारी काळ होता. त्यांना मान होता. वर्षभर मागे लागलेल्या पोराला पोरी आपला नंबर द्यायच्या नाहीत. पण फोटोग्राफरला स्वतःहून नंबर द्यायच्या. फक्त ‘माझे फोटो लवकर पाठवा हां दादा’ म्हणायच्या. फोटो स्टुडीओत जाणं व्हायचं. लग्न ठरवताना दाखवायला लागतील म्हणून मुली फोटो काढायला जायच्या, मग त्याच मुली लग्न झाल्यावर डोहाळेवाले फोटो काढायला स्टुडीओत जायच्या, मग लेकराला घेऊन फोटो काढायला. आता किती वर्ष झाले आपल्याला फोटो स्टुडीओत जाऊन? फोटो स्टुडीओत गेलं की भिंत बघून कोण फोटो काढून गेलय हे कळायचं. आता फार फार तर पासपोर्ट फोटो काढायला चक्कर होते. मित्राच्या स्टुडीओत गेलो होतो. तो म्हणाला, तुला कधी लिहायला एकांत पाहिजे असला तर येऊन बसत जा. पण तो एकांत नव्हता. ते त्या स्टुडीओचं एकाकीपण होतं. अस्वस्थ करणारं. कधीकाळी खास डार्करूम असलेले बरेच स्टुडीओ आता अंधाऱ्या खोल्या झालेत. डिजिटल जगाने सगळं बदलून टाकलय. मुलांचे फोटो काढायला असलेले लाकडी घोडे हरवून गेलेत. पूर्वी गावातल्या स्टुडीओत असलेला पडदा किंवा खुर्ची सगळ्या फोटोत कॉमन असायची. मुळात माणसाचा एखादा फोटो असला पाहिजे एवढीच अपेक्षा असायची. खुपदा वय झालेल्या लोकांचे फोटो काढून ठेवले जायचे. गेल्यावर भिंतीवर लावायला होईल म्हणून. फोटो ही पूर्वी माणूस गेल्यावर आठवण म्हणून असणारी गोष्ट होती. पुढे कुटुंबाने एकत्र फोटो काढायची हौस आली. शाळेत ग्रुप फोटो निघू लागले. त्या ग्रुप फोटोत इतरांनी आपल्याला शोधलं की भारी वाटायचं. मग पासपोर्ट फोटोचा जमाना. आवडत्या व्यक्तीचे फोटो पाकिटात ठेवण्याची सवय. आमच्या शेजारच्या काकांना पेपरमध्ये फोटो येण्याचं खूपच अप्रूप. आपल्या मुलाचा पेपरमध्ये फोटो यावा अशी त्यांची खूप इच्छा होती. पण ४५ टक्के मिळवणारा मुलगा तो. त्याचा पेपरात फोटो कसा येईल? तेंव्हा त्यांना एकाने ‘हरवला आहे’ अशी जाहिरात टाका, मग पेपरात फोटो येईल असा सल्ला दिला. तेंव्हा हसू आलं पण नंतर खूप भयंकर वाटलं. जुनी गोष्ट आठवली. एका गावातला माणूस गायब झाला होता. त्याची बायको पोलीस स्टेशनला गेली. पण तिच्याकडे नवऱ्याचा फोटो नव्हता. शोध कसा घेणार? एकेकाळी एकही फोटो नसलेली असंख्य माणसं होती देशात. पण त्या माणसांच्या आठवणी काढत रहायचं गाव. आता फोटो खूप आहेत. पण माणसांबद्दल किती बोललं जातं? माणसं मोबाईलमध्ये डोकावत असतात फक्त. हेडफोन असतात कानात. त्यामुळे वाटतं की आपल्याकडे खूप ऐकणारी माणसं आहेत. पण सार्वजनिक जागांची अवस्था बघितली की ही ऐकणारी माणसं आहेत असं मुळीच वाटत नाही. ही कुणाचच न ऐकणारी माणसं आहेत असं वाटतं.
आपण आता आपल्यातच रमलेली माणसं होतोय. आपल्याला आपल्या फोटोत चुकून कुणी आलेलंही चालत नाही. क्रॉप करतो आपण इतरांना. कोळसेवाडीत फोटो काढून फोटोशॉपमध्ये मागे आयफेल टॉवर टाकणारे लोक झालोय आपण. फोटो काढायची हौस असणं ठीकय. पण सतत स्वतःचे फोटो काढायचं वेड असण्याचं काय करायचं? आता गल्लीबोळातला नगरसेवक पण कायम कॅमेरामन घेऊन फिरतो. दिवसातून दहा वेळा सेल्फी काढणारे मुलं मुली तुम्ही आसपास पाहिले असतील. काही लोकांना फोटो काढताना बघून असं वाटतं की यांना तत्काळ डॉक्टरकडे न्यावं. दिवसात तीन गोळ्या घ्यायला सांगतात तसं दिवसात फक्त तीन सेल्फी घेण्याचं प्रिस्क्रिप्शन द्यायला सांगावं. बरं त्या फोटोत आपण आहोत तसं दिसायला नको आहे लोकांना. त्यासाठी कॅमेरामध्ये फिल्टर आलेत. सगळे प्लास्टिकसारखे दिसतात. पांढरे फटक. एवढी विविधता असलेल्या देशात सगळ्यांना एकसारखं दिसायचं. गोरंपान. प्लास्टिकसारखं. खरतर तुमचा सगळ्यात सुंदर फोटो कुठला असतो? ज्यात तुम्ही तुमच्या आईसारखे किंवा वडिलांसारखे दिसता. पण आता तेच नकोय. आता फिल्टर वापरायचाय. फोटो एडीट करायचाय. आपण जसे नाही तसे दिसणं म्हणजे सौंदर्य असेल तर अवघड आहे. खरतर हे फिल्टर आपल्याला बदलत नाहीत. फोटोला बदलत असतात. पण नकळत आपण बदलून जातो माणूस म्हणून. आपण त्या साच्यात अडकून जातो. माणसाला बदलणारे फिल्टर फार आवश्यक झालेत.
“आपण आता आपल्यातच रमलेली माणसं होतोय. आपल्याला आपल्या फोटोत चुकून कुणी आलेलंही चालत नाही. क्रॉप करतो आपण इतरांना.”
संक्रातीला सोसायटीत एकमेकांना तिळगुळाचे फोटो पाठवून गोडवा वाढण्याची अपेक्षा कशी करता येईल? शौचालायावर पण नेत्यांचे फोटो असतील तर लोकांचं पोट काय मनसुद्धा साफ राहणार नाही. आजही गावाचं चित्र म्हणून आभाळाकडे बघणारा शेतकऱ्याचा फोटोच दिसत असेल तर काय समजायचं? फक्त लेन्स बदलली. फिल्टर बदलले. समाज तसाच आहे. शेतकऱ्याने आभाळाकडेच बघायचं असेल तर गावोगाव नेत्यांचे भलेमोठे फोटो कशाला पाहिजेत? खड्डे पडलेल्या रस्त्याला, गटाराच्या वर, बेरोजगार मुलांच्या टोळक्यासमोर दात काढणारे नेत्यांचे फोटो बघून तिडीक जाते लोकांच्या डोक्यात. पण लगेच दुसऱ्या एखाद्या होर्डिंगवर एखाद्या सुंदर नटीचा फोटो दिसतो आणि लोक शांत होतात. नेत्यांच्या नाही पण आपण आपल्या फोटोवर विचार करू शकतो. आता आपण खातोय कमी आणि फोटो जास्त काढतोय. ते अंगाला लागत नाहीच पण मनाला जास्त लागतय. हळूहळू हा बुद्धीजीवी लोकांचा देश फक्त फोटोजीवी होऊ नये एवढच.