बंडू गावात कलाकार म्हणून ओळखला जायचा.
बंडू गावात कलाकार म्हणून ओळखला जायचा. शेतीचा कंटाळा असल्यामुळे तो शेताकडे फिरकायचा नाही. गावात चकाट्या पिटत बसणे हा त्याचा उद्योग. लग्न झाल्यावर तो वेगळा निघाला. मुलगी झाली. त्याच्या हिश्याला आलेली काही गुंठे शेती त्याने वेगवेगळे धंदे करून विकून टाकली. देशात असा कोणताच पक्ष नाही ज्या पक्षात बंडूने प्रवेश केला नाही. जिल्ह्यात असा कोणताच नेता नाही ज्याच्यासोबत बंडूचा फोटो नाही. तालुक्यात असं कोणतंच गाव नाही त्यातल्या एका तरी पक्षाच्या फलकावर बंडूचं नाव नाही. एखाद्या गावात त्याचं नाव शिवसेनेच्या फलकावर आहे. एखाद्या गावात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या. नेतेच इकडे तिकडे उड्या मारतात तर बंडू काय करणार? शेवटी राजकारण हा फालतू लोकांचा धंदा आहे असं म्हणून बंडूने राजकारणातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. पान टपरी टाकली. पण उधारीने सगळी वाट लावली. घरात बायको आणि पोरगी. रोज काही ना काही कुटाणे करून घरी पैसे कसे आणायचे हाच प्रश्न पडलेला असायचा त्याला. कधी मंडप वाल्याला मदत कर, कधी आणखी कुणाचं काम कर आणि पैसे घे असं चालू होतं त्याचं. आणि अचानक एक दिवस बायकोनी बॉम्बच टाकला. तिला पुन्हा दिवस गेले होते.
बंडू तालुक्यातल्या डॉक्टर कड गेला. भावाकडून उधार पैसे घेतले होते. सोनोग्राफी केली. चाटे डॉक्टर म्हणाले मुलगा आहे. बंडूच्या आनंदाला पारावार उरला नाही. अंगात बळ आल्यासारखं झालं. दुप्पट काम करायला लागला. बायको खूप दिवसांपासून म्हणत होती गावात राहून काही होणार नाही आपलं. बंडूने आता मनावर घेतलं. तालुक्यात जाऊन राहू लागला. मुलीला जिल्हा परिषद शाळेत टाकलं. पेपर वाटू लागला. दिवसभर एका फळाच्या दुकानात काम करू लागला. नवरा बायको स्वप्न बघायला लागले. पोरांना चांगलं शिक्षण द्यायचं. पोराला डॉक्टर बनवायचं. बाळंतपण आटोपलं की एक मेस सुरु करायची ठरवलं होतं दोघांनी. अधून मधून चाटे डॉक्टर कड जाऊन औषद गोळ्या घ्यायचे. चाटे डॉक्टर बोलायला भारी माणूस. सगळ्या बायकांना नावानी ओळखायचा. मूड मध्ये आला की पोराचं नाव काय ठेवायचं ते पण सांगायचा.
सलीमच्या तीन चार पिढ्या फळाचा व्यापार करायच्या. गेल्या काही महिन्यात बंडू त्याच्याकडे कामाला लागला. पण बंडूवर सलीमचा विश्वास बसला. सलीमला पण तीन पोरी होत्या. बंडू आग्रह करून सलीमला पण चाटे डॉक्टरकडे घेऊन गेला. सोनोग्राफी झाली. सलीमला भीती वाटत होती. पण बंडूला विश्वास होता चाटे डॉक्टरवर. त्यांनी पोरगी आहे असं सांगून सलीमची अडचण दूर केली. सलीमने डॉक्टर सोबत बंडूचे पण आभार मानले. सलीम आता प्रत्येकवेळी चाटे डॉक्टरकडे येणार होता. चेकिंग करणार होता. मुलगा होईपर्यंत बायकोला कितीदा गरोदर रहावं लागणार होतं काय माहित?
एक दिवस बंडूची बायको त्रास व्हायला लागला म्हणून चाटे डॉक्टरच्या दवाखान्यात भरती झाली. बंडू खुश होता. पेढे कुठून आणायचं ठरलं होतं. पहिली बातमी सलीमला द्यायची हे पण नक्की होतं. चाटे डॉक्टर बाहेर आले. तसे रोजच्यासारखे दिसत नव्हते. डिलिवरी नॉर्मल झाली एवढच म्हणाले आणि घाईत असल्यासारखे निघून गेले. नर्स बाहेर आली. बंडूला म्हणाली जिलेबी आणा लवकर. बंडू हैराण झाला. नर्सचा काहीतरी गोंधळ झाला असणार असं वाटलं त्याला. पण त्याने खात्री करून बघितली तर खरंच मुलगी होती. बायको रडत होती. जन्मलेली पोरगी पण रडत होती. बंडू पण रडवेला झाला होता. बंडूच्या मोठ्या मुलीला कळत नव्हतं की एवढ सुंदर बाळ झालंय तरी हे लोक असे नाराज का दिसताहेत? ती बाळाशी खेळायला पण लागली होती.
सलीमने दिवसभर वाट पाहिली. पण बंडू काही दुकानाकडे फिरकलाच नव्हता.सलीम स्वतः बंडूच्या घरी गेला. दवाखान्यात गेला. पण बंडू कुठेच नव्हता. सलीमच्या लक्षात आलं मुलगी झाली म्हणून बंडू नाराज असणार. सलीम त्याला शोधत फिरला. बंडू दारू पिऊन एका हातगाडीवर झोपला होता. सलीम त्याला घरी घेऊन गेला. पण दुसऱ्या दिवशी पण बंडू कामावर आला नाही. लोक सलीमला बोलवायला आले. बंडू चाटे डॉक्टरच्या दवाखान्यात गोंधळ घालत होता. चाटे डॉक्टरला मारून टाकायची धमकी देत होता. तिथल्या लोकानी बंडूला एका खोलीत कोंडून टाकलं होतं. सलीम गेला. बंडूला सोडवल. दोघं चाटे डॉक्टरच्या खोलीत गेले. सलीम तसा दादाच होता. सगळे त्याला घाबरायचे. चाटे डॉक्टर आधी मी मुलगा होणार असं म्हणालोच नव्हतो म्हणत होते. पण सलीमसमोर कबूल झाले. सगळा तोंडी कारभार असला तरी सलीमसारखा साक्षीदार असल्यावर पर्याय नसतो. सलीम म्हणाला, ‘क्या बात कररे? मेरे सामने बोला ना आपने डाक्टर. अभी कैकु जबान घुमारे?’ चाटे डॉक्टरला लक्षात आलं आता शहाणपणा करून चालणार नाही. डॉक्टर म्हणाले पोरीचा इथून पुढचा सगळा खर्च मी करतो. फक्त बोंबाबोंब करू नका. दर महिन्याला जे काही पैसे लागतील घेऊन जा. बंडू कसाबसा तयार झाला.
हळूहळू बंडू दुखः विसरला. बायको त्याला मेस सुरु करायची आठवण करून द्यायची. पण बंडूने आता दारू सुरु केली होती. आता तो दुसरं काही सुरु करण्याच्या अवस्थेत नव्हता. त्याने सलीमच्या दुकानावर जाण पण सोडून दिलं. सलीम तरी किती दिवस समजवणार? बोलून बोलून थकला आणि नवीन माणूस ठेवला बिचाऱ्याने. आता बंडू दर महिन्याच्या एक तारखेला चाटे डॉक्टरच्या दवाखान्यात हजर होतो. डॉक्टर पैसे काढून देतात. बंडू दारू पितो. काहीच करत नाही. मुलगी मोठी झाली. बायको डॉक्टरला भेटली. बंडू सगळे पैसे दारूत उडवतो हे लक्षात आल्यावर डॉक्टरने मुलीला स्वतः इंग्लिश शाळेत टाकलं. सगळी फीस भरली. आता बंडूची मोठी मुलगी जिल्हा परिषद शाळेत जाते आणी छोटी मुलगी इंग्लिश स्कूल मध्ये. मोठी मुलगी पायी जाते तर छोटी मुलगी स्कूल बसमध्ये. मोठी मुलगी मराठी कविता पाठ करते. छोटी मुलगी इंग्रजी. मोठ्या मुलीच्या वाढदिवसाला बंडूची बायको पुरण पोळी करते. छोट्या मुलीच्या वाढदिवसाला डॉक्टर मोठा केक पाठवतात. मोठ्या मुलीला आई घरीच फ्रॉक शिवते. छोट्या मुलीला डॉक्टर नवे ड्रेस पाठवतात. बंडू फक्त दारू पितो. नियतीने चालवलेला खेळ बघत राहतो. आपल्याच दोन लेकींच्या नशिबाचा हा खेळ बघत बघत तो झोपी जातो. दिवसाही तसा तो बेशुध्द असल्यासारखाच असतो. चाटे डॉक्टरच्या चुकीमुळे आपल्या आयुष्याचं वाटोळ झालं का कल्याण झालं हे सुद्धा आता त्याला कळत नाही. कधी वाटतं बरं झालं कष्ट करायची गरज नाही. बसल्या जागी दारूला पैसे मिळतात. मुलगा झाला असता तर रोज मरमर करावी लागली असती. कधी वाटतं मुलगा झाला असता तर आपण किती चांगले राहिलो असतो. असं दोन्ही बाजूने विचार करत दारू पीत राहणे एवढाच त्याचा उद्योग. आणि न चुकता तो देवाचे आभार मानतो. बसल्या जागी सगळं देतोय म्हणून.
देव सुद्धा बसल्या जागी कसं देणार एवढे दिवस? आणि चुकीची शिक्षा दिल्याशिवाय राहणार कसा? एक दिवस चाटे डॉक्टरवर केस झाली. गर्भपाताच्या गुन्ह्यात अटक झाली. मोठी शिक्षा सुनावली गेली. बंडूच्या पायाखालची जमीनच सरकली. आता आपल्या छोटीचं काय? तिची फीस कोण भरणार? आपल्याला पैसे कसे मिळणार? दारू कुठून मिळणार? चाटे डॉक्टर हे काय करून बसला? त्याला पहिल्यांदा चाटे डॉक्टर करत असलेलं काम चुकीचं होतं असं वाटलं. मग पुन्हा असं वाटलं चाटे डॉक्टरला अटक व्हायला नव्हती पाहिजे. आपल्या स्वार्थासाठी माणूस गुन्हेगाराचं पण समर्थन करायला लागतो. एका घटनेने बंडू उध्वस्त झाला होता. घाईत चाटे डॉक्टरला भेटायला जेल मध्ये गेला. बंडूच्या लक्षात आलं आता चाटे डॉक्टर आपल्याला भीतीने पैसे देणार नाही. असाही तो बदनाम झाला होता. आता आपण त्याला बदनामीची धमकी काय देणार? बंडू भेटायला गेला तेंव्हा चाटे डॉक्टर शांत होता. आता माझ्यावरच अशी वेळ आली. तू समजू शकतोस असं म्हणाला. बंडूला हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. गुन्ह्याखाली अटक चाटे डॉक्टरला झाली होती. पण बंडूला गुन्हेगार असल्यासारखं वाटत होतं. तुरुंगात डॉक्टर होता पण बेड्या पडल्याची भावना बंडूला झाली. बंडू परत निघाला. तेंव्हा त्याला एक ओळखीच वाक्य ऐकू आलं. ‘ पोरीकड लक्ष ठेवा!’ आजवर आपल्या पोरीकड लक्ष ठेवा असं बंडू शेकडो वेळा म्हणाला होता डॉक्टरला. आता डॉक्टर आपल्या पोरीकड लक्ष ठेवा म्हणून सांगत होते बंडूला. सांगणं भाग होतं. डॉक्टरच्या पोरीला शाळेत खूप चिडवत होते. अपमानित करत होते. तिचा बाप राक्षस आहे असं पेपर मध्ये लिहून आलं होतं. बंडूच्या डोक्यात एकच वाक्य घोळत होतं घरी येई पर्यंत. ‘ पोरीकडं लक्ष ठेवा! ‘
– अरविंद जगताप.
0 Comments