पुलं लेखक म्हणून नावारूपाला यायच्या आधीची गोष्ट. लग्नाच्या आधीच्या गोष्टी.
पुलंची बायको म्हणजे सुनीताबाईंनी घरी आईला सांगितलं की त्यांनी लग्न ठरवलय. त्यानंतर त्यांचा दोघींचा असा काहीसा संवाद झाला.
कोणाशी ठरवलयस? आईने विचारलं.
आहे एक. सुनीताबाई म्हणाल्या. मग आईने विचारलं, पण त्याला काही नाव गाव?
त्यावर सुनीताबाई म्हणाल्या, त्याने काय फरक पडणार आहे? नाव गावात काय आहे?
मग आईने विचारलं, गोराबिरा आहे ना?
यावर सुनीताबाई म्हणाल्या, गोरेपणात काय आहे? ब्रिटीश लोक गोरेच ना? ते काय चांगले म्हणायचे?
आईने विचारलं, ब्रिटीश आहे की काय?
सुनीताबाई नाही म्हणाल्या. मग एक आई चौकशा करेल तशा चौकशा. आणि सुनिताबाईंची त्रोटक उत्तरं. हे सगळं सुनीताबाईंचं भावाने म्हणजे सर्वोत्तम ठाकूर यानी खूप छान लिहून ठेवलय. पुलं आणी सुनीताबाई सुरुवातीपासून किती स्पष्ट आणी आधुनिक विचारसरणीचे होते याची जाणीव होते. जाती धर्माच्या बाबतीत दोघांच्या मनात कुठल्या गैरसमजुती नव्हत्या.पुलंची गंमत म्हणजे ते एलएलबी झाले आणि मग घरची जवाबदारी होती म्हणून मग बीए झाले. सुनीताबाईंच्या आईने जेंव्हा जावई काय करतो हे विचारायला सुरुवात केली तेंव्हा सुनीताबाईंनी पुलं नाटकात काम करतात. गाण्याच्या शिकवण्या घेतात वगैरे पण सांगितलं. यावर सुनीताबाईंना आईने विचारलं,शिकवणीत बरे पैसे मिळतात काय गं?
सुनीताबाई म्हणाल्या, अग कसले. महिना तीन रुपये शिकवणी आणि पुण्याला होता तेंव्हा लोकांनी तेसुद्धा बुडवले.
आई हैराण झाली. म्हणाली, बुडवले? शिकवणी ठेऊन त्याचे तीन रुपये बुडवले? जळलं मेल्याचं लक्षण.
यावर सुनीताबाईनी पुलंचा आणखी एक किस्सा सांगितला. एका म्हातार्या बाईला गाणं शिकवायला जावं लागायचं त्यांना. आणि ती म्हातारी बाई गाणं का शिकत होती तर तिला कुणीतरी सांगितल होतं की गाणं शिकल्याने दमा बरा होतो. एका माणसाने तर चक्क एका घरगुती स्पर्धेत भाग घ्यायचा होता म्हणून पुलंची शिकवणी लावली होती. आणी कहर म्हणजे त्या माणसाला फक्त एकच गाणं शिकायचं होतं.
पुलं लेखक म्हणून नावारूपाला यायच्या आधीची गोष्ट. लग्नाच्या आधीच्या गोष्टी. पुलंसारखाच सुनीताबाईंचा पण धार्मिक विधीवर विश्वास नव्हता. म्हणून लग्न रत्नागिरीला सुनीताबाईंकडे पण कोर्टात करायचं ठरलं. आठ आण्याला लग्नाची नोंदणी करायचा अर्ज यायचा त्याकाळी. १९४६ सालच्या जून महिन्यातली गोष्ट. तेरा जून ही लग्नाची तारीख ठरली होती. सुनिताबाईंचा भाऊ सर्वोत्तम ठाकूर यांनी आठवणी लिहिल्यात. ते स्वतः तेरा जूनला लग्न म्हणून बाहेरगावाहून बारा तारखेला आले. आणि आल्यावर त्यांना लक्षात आलं की वेळ होता म्हणून बारा तारखेलाच दुपारी लग्न उरकून टाकण्यात आलेय. सुनीताबाईंच्या वडिलांचे मित्रच होते वकील. एरव्हीही तेरा जून हा काही पंचांग पाहून काढलेला मुर्हूर्त नव्हता. वकील म्हणाले आम्ही आजपण मोकळे आहोत. मग वकील लोक घरी आले. पुलं घरच्या कपड्यावर बसलेले. त्यांना तेंव्हाच माहिती मिळाली की उद्या अस्लेल आपलं लग्न आजच करायचा विचार आहे. पण कसली तक्रार करायचं काही कारण नव्हतं. साधेपणाने दोन साक्षीदारांसमोर लग्न झालं.
पुलं लग्नात काही देण्या घेण्याच्या विरोधात होते. पण सासूबाई आग्रही. त्या म्हणाल्या, या देशपांड्यांनी रत्नागिरीच्या भिकाऱ्याच्या मुलीशी लग्न केल असं कोणी म्हणता कामा नये. आणि असं म्हणून पुलंच्या बहिणीला आणि आईला त्यांनी साडी दिली. स्पष्ट बोलणारी प्रेमळ माणसं हे आपल्या जुन्या लोकांचं वैशिष्ट्य. अगदी साधेपणाने झालेल्या या लग्नाची तारीख होती बारा जून. आणी पुलं आपल्याला सोडून गेले ती तारीखही बारा जून. तेही अगदी शांत आणि साधेपणाने. पुलंसारख्या मोठ्या माणसांचा साधेपणा खूप काही शिकवणारा असतो. मला नेहमी वाटतं पुलं हा एकच दोन अक्षरी शब्द मराठी भाषेची श्रीमंती लक्षात यायला पुरेसा आहे.
0 Comments