आज रेल्वे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालीय. आपल्या देशात इंग्रजांनी रेल्वे सुरु केली. सुरू केली ती व्यापारासाठी. म्हणजे इथल्या ईस्ट इंडिया कंपनीवाल्यांना भारत हा फक्त व्यापारपेठ म्हणूनच दिसत होता. इथून जेवढा काही मलिदा नेता येईल तेवढा त्यांना न्यायचा होता. इथून कंपनी सरकारचे अधिकारी तिकडे इंग्लंड मधल्या सरकारला भारतात रेल्वे सुरू करू म्हणून पत्र पाठवत होते. विनंती करत होते. पण इंग्रजांना भारतातल्या रेल्वेवर खर्च करणं मान्य नव्हतं. आणि दुसऱ्या देशात एखादी सुविधा करून द्यायला करोडो रुपये कोण खर्च करणार? पण इथले इंग्रजी अधिकारी खमके होते. एखादी गोष्ट करायची म्हणजे करायची. त्याकाळात म्हणजे 1853 मध्ये लॉर्ड डलहौसी नावाचा अधिकारी होता. त्याने इंग्रज सरकारला पत्र पाठवून भारतात रेल्वे का महत्त्वाची आहे ते मोठ्या हुशारीने कळवलं . तो लिहितो, इंग्लंडला अत्यंत आवश्यक असणारा कापसासारखा कच्चा माल भारतात मुबलक आहे. पण तो निर्यातीसाठीं बंदरापर्यंत वेगाने आणता येत नाहीं. त्यासोबतच इंग्लंडच्या पक्क्या मालाला भारतात खूप मोठी बाजारपेठ आहे, पण माल भारतात पोचवायला वाहतूक साधन उपब्लध नाहीं. रेल्वेमुळे ह्या अडचणी दूर होतील. शिवाय, राजकीय आणि लष्करी कारणासाठीही रेल्वेची आवश्यकता आहे.
इंग्रज सरकार तरीही एवढा मोठा खर्च करायला तयार नव्हतच. शेवटी डलहौसीने वेगळाच डाव टाकला. त्याने सरकार या कामाकडे लक्ष पुरविणें आपले कर्तव्य समजत नाहीं, तेव्हां खासगी कंपन्यांनी यांत भांडवल गुंतवावें म्हणून ज्या सवलती व हमी त्यांना द्याव्या लागतील त्या त्यांना देणें जरूर आहे. असा संदेश पाठवला. कुठल्याही सरकारला परस्पर काम होत असेल, खाजगी कंपन्या खर्च करत असतील तर ते हवंच असतं. कारण त्यात कंपन्या आणि सरकार दोघांना भरपूर फायदा असतो. खर्च वसूल करायला अडचण नसते. पण खाजगी कंपन्या पण एवढ्या सरळ नसतात. त्यांना मनमानी हवी होती. सरकारी बंधन नको होतं. या वादात दोन तीनदा काम बंद पडायची वेळ आली. रोखे काढले गेले. जनतेचे पैसे गुंतवले गेले. पण रेल्वे बनत असताना आपल्याकडे आणखीही खूप काही घडत होतं. इंग्रज जेंव्हा रेल्वेचे रूळ बनवायला लागले तेंव्हा लोक घाबरून गेले. लोखंडी रस्ता बनवताहेत म्हणून खूप अफवा पसरल्या. लोखंडी रस्ता बनवायला अकरा नरबळी द्यावे लागतात अशी बातमी पसरली. इंग्रज माणसं उचलून नेताहेत बळी द्यायला या भीतीने बरेच लोक एकटे बाहेर पडायचे नाहीत. १८५३ मध्ये रेल्वे सुरु झाली तेंव्हा ती बघायला सरकारी सुट्टी जाहीर झाली होती. रेल्वे धाऊ लागल्यावर लोकांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. ओरडू लागले. त्याकाळी रेल्वेवर पोवाडे आणि कविता पण रचल्या गेल्या. त्यातला एक कटाव मुंबईचे वर्णन पुस्तकात आहे.
हिंदुस्थानी आगीची गाडी, तिला बांधला मार्ग लोखंडी
मनाचाही वेग मोडी, मग कैची हत्ती घोडी
पाहुनी झाली माणसे वेडी, पाऊन तासात ठाण्यास धाडी
आधी निघाली युरोप खंडी, प्रसार मोठा तिचा इंग्लंडी
अजून पसरेल पिंडी ब्रम्हांडी, वृध्द तथापि म्हणती लबाडी
गरीबांचा व्यापार मोडी, हिंदुस्थाना दरिद्र जोडी.
एकदाची मुंबई ते ठाणे रेल्वे पूर्ण झाली. त्याचे उद्घाटन कसे झाले ते वर्णन कृष्णशास्त्री भाटवडेकर यांच्या पुस्तकात आहे.
“कित्येक साहेब- लोक व मुंबईतील मोठमोठाले गृहस्थ मिळून पांचरों आसामी या समारंभांत सन्मानार्थ आले होते. मौज पाहाण्यासाठीं बोरीबंदरनासून तो थेट – भायखळ्यापर्यंत मोठीच गर्दी झाली होती. साडे तीन वाजल्याबरोबर राजकीय सलामीची डोंगरी किल्ल्याच्या तटावरून तोफांची सरबत्ती झाली…तीन आगीच्या गाड्या लावल्या होत्या. त्यांनीं ती रांग ओढली. गाडी मोठ्या डौलानें निघाली तेव्हां तेथे जमलेल्या हजारों लोकांच्या समुदायास मोठेंच साल्हाद आश्चर्य वाटले….. पाणी घेण्याकरितां शिवेपलीकडे जो विसावा घेतला त्यासुद्धां ठाण्यापर्यंत जाणाऱ्या या अल्पप्रवासास सत्तावन्न मिनिटांचा वेळ लागला. ”
रेल्वे बद्दल पुढेही खूप लोकांनी लिहिलं. आजही लिहितात. पण आजही रेल्वे प्रवास करणाऱ्या लोकांच्या तक्रारी फार बदलल्या असं नाही. त्याकाळी एकाने लिहिलं,
” तिसऱ्या वर्गातून प्रवास करणारांचे हाल आजच्यासारखेच होते व बायकांना स्वतंत्र डबा नसल्यामुळे वांड पुरुषांचा त्रास सहन करावा लागे.“
१९०३ मध्ये तिसऱ्या वर्गातील प्रवाशांनी नोंदवलेल्या काही ठळक तक्रारी पुढीलप्रमाणेः
प्रवाशांची प्रचंड दाटीवाटी आणि अपुऱ्या रेल्वेफेऱ्या.
धार्मिक यात्रा, तीर्थक्षेत्रांसाठी गुरे वाहून नेण्याचे डबे आणि मालवाहतुकीची बोगी वापरणे.
डब्यांमध्ये शौचालयाची सुविधा नसणे.
भोजनाची सुविधा नसणे आणि पिण्याच्या पाण्याचा तुटवडा.
आरक्षणाची अपुरी आणि विसकळीत सुविधा.
तिकीट-तपासणी करताना होणारा अन्याय, पिळवणूक.
रेल्वेस्थानके, फलाट आणि गाडीमध्येदेखील घडणारी लाचलुचपत, सक्तीची दंडवसुली.
आजच्याच तक्रारी वाटतात ना? अर्थात रेल्वे बद्दल तक्रारी असल्या तरी रेल्वेने फायदे पण खूप झाले. फक्त या विकासात सामान्य माणूस अजूनही गृहीत धरला जातो. आणखी एक, या रेल्वेबद्दलची सगळ्यात महत्वाची तक्रार केली होती ती आणखी एक इंग्रज अधिकाऱ्याने. कॉटन असं नाव असलेला अधिकारी. त्याच्या मते रेल्वे बांधणी हा एक ‘सुशिक्षित बेरडांनी केलेला महाघोटाळा’ होता. ज्यात भारताची साधन संपत्ती लुटली जात होती. आणि गुंतवणूकदार लूट करत होते. “आम्ही आमच्या नजरेसमोर रेल्वेच्या भव्य कामाचा दुःखद, अपमानास्पद देखावा पाहत होतो. त्यामुळे गरीब, दरिद्री भारताला १६ कोटी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला. (त्या काळात ही रक्कम महामहामहा प्रचंड होती.) हा खर्च पूर्णतया निरुपयोगी होता. कारण भारताला त्याची गरज नव्हती. आता त्याच रुळांच्या बाजूला लाखो लोक भुकेने मरत आहेत.”
आजही गरज नाही तिथे हायवे, मेट्रो बनताहेत . गुंतवणूकदार मलिदा खातात. पण त्यावर तळमळीने बोलणारे, आपल्या सरकारला सुनावणारे कॉटन सारखे स्पष्ट आणि प्रामाणिक अधिकारी मात्र दिसत नाहीत.
“आजही गरज नाही तिथे हायवे, मेट्रो बनताहेत . गुंतवणूकदार मलिदा खातात. पण त्यावर तळमळीने बोलणारे, आपल्या सरकारला सुनावणारे कॉटन सारखे स्पष्ट आणि प्रामाणिक अधिकारी मात्र दिसत नाहीत.”