दिप्या दहा वर्ष झाले साहेबांसोबत होता. साहेबांची प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी होतेय का नाही हे पाहणं दिप्याचं काम.
दिप्या दहा वर्ष झाले साहेबांसोबत होता. साहेब म्हणजे पक्षाचे आमदार प्रकाश गोरे. साहेबांची प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी होतेय का नाही हे पाहणं दिप्याचं काम. आधी तो साहेब गावात येऊन सभा घ्यायचे त्या सभेला हजर असायचा. त्यांच्या गाडीमागं गावाच्या बाहेरपर्यंत धावायचा. असाच धावत असताना एक दिवस तो पडला आणि त्याच्या दृष्टीने त्याचं नशीब उघडलं. साहेबांच्या लक्षात आलं. दिप्या साधासुधा पडला नव्हता. त्याला टाके पडले होते.
साहेबांनी त्याला दुसर्या गाडीत बसवून दवाखान्यात पाठवलं. नंतर त्याची भेट घेतली. आणि बोलता बोलता त्याला म्हणाले की माझ्यासोबत थांब. माझं काम कर. दिप्या त्या दिवसापासून साहेबांचा उजवा हात झाला. साहेबांच्या उजव्या हाताने आज पर्यंत साहेबांच्या डाव्या हाताला सुद्धा कुठली गोष्ट कळू दिली नाही. साहेबांनी काम सांगायचं आणि दिप्याने करायचं हे ठरलेलं होतं. आजपर्यंत साहेबांनी सांगितलेलं काम दिप्याने यशस्वी केलं नाही असं झालं नाही. साहेब कोणत्या वारी कुठल्या रंगाची चड्डी घालणार इथपासून ते साहेबांना कोणत्या गावात कुणाच्या घरचा चहा लागतो इथपर्यंत दिप्या ठरवतो. साहेबांचा एवढा विश्वास दिप्याने कमवला त्यामागे त्याचे कष्ट पण खूप आहेत.
साहेब आधी साधे तालुकाप्रमुख होते. पैसा होता पण कार्यकर्ते नव्हते. दादागिरीशिवाय गावपातळीवर नाव होत नाही हे त्यांना चांगलं माहित होतं. त्याच्यामुळ दिप्या सारखे पोरं त्यांनी जपले होते. खरतर दिप्यासारखे साहेबांचे दहा तरी उजवे हात होते. पण प्रत्येकाला आपणच साहेबांच्या सगळ्यात जवळचे असं वाटायचं. हीच साहेबांची खासियत होती. कधी पान खाता खाता त्यातली लवंग दिप्याला द्यायचे. कधी सुन्याला इलायची द्यायचे. साहेबांनी पानातली इलायची दिली हेच सुन्या दहा दिवस लोकांना सांगत होता.
साहेबांनी सांगितलं एखाद्या तलाठ्याला शिव्या देऊन या की लगेच दिप्या नाहीतर आणखी कुणी तलाठ्याला शिव्या देऊन यायचे. एकदा सुन्या साहेबांच्या सांगण्यावरून तहसीलदाराला काळ फासायला गेला. काळी शाई लावली. तहसीलदाराचा चेहरा विद्रूप केला. पण तिथं असलेल्या पत्रकाराने विचारलं की हा प्रकार का केला? सुन्याला मात्र माहीतच नव्हतं की आपण तहसीलदाराला काळ का फासलं? तो हे साहेबाना विचारायचं विसरूनच गेला होता. दिप्या मात्र नीट माहिती घेऊन जायचा. म्हणून साहेबांचा त्याच्यावर विश्वास होता.
आधी एकदा सुन्याने पालकमंत्र्यासोबत आलेल्या एका बाईचा फोटो त्यांची बायको म्हणून फेसबुकवर टाकला होता. खूप लोकांनी तो शेअर पण केला होता. साहेबांच्या मेहुण्याने तर प्रदेशाध्यक्ष आले होते तेंव्हा एकदा मोहाची पिऊन बघा, आमच्या गावात प्युअर भेटती असा सल्ला दिला होता. तेंव्हापासून साहेब महत्वाचे कामं दिप्याला सांगायला लागले.
साहेबांसोबत असतो म्हणून गावात दिप्याची वट वाढली होती. सकाळी घरून निघताना दोन तीन तरी लोक आता दिप्याच्या दारात उभे असतात. दिप्याने साहेबांकडे शब्द टाकावा म्हणून. दिप्या पण शक्य तेवढ्या सगळ्या लोकांचं काम करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे शब्द टाकायचा साहेबाकडे. पण आता त्याला माहित झालं होतं की काम होणं एवढ सोपं नसतं. आणि साहेब छोट्या मोठ्या कामात लक्ष देत नाहीत. दिप्या साहेबांचे गावातले कामं बघायचा. साहेब त्याला मुंबईत कधी घेऊन जायचे नाहीत. तिकडं त्यांचा दुसरा पीए होता.
प्रत्येकाला आपल्या जागेवर ठेवण्यात साहेबांचा हात कुणी धरणार नाही. दिप्या दिवस रात्र साहेबासाठी राब राबायचा. पुढच्यावेळी सत्ता आली की साहेब नक्की मंत्री होणार हे स्वप्न साहेबांच्या नंतर त्यानेच जास्त वेळा पाहिलं असणार. दिप्याची अपेक्षा होती की कधीतरी आपल्याला लोकांनी साहेब म्हणावं. पण गावात अजून तो दिप्याच होता. साहेब पण त्याला चार चौघात दिप्याच म्हणायचे. आता सगळ्यांना सवय झाली होती त्याला दिप्या म्हणायची. कधी तरी साहेब दौर्यावर असले की दिप्या भरपूर दारू पितो आणि मित्रांना आपल्या मनातली खंत बोलून दाखवतो. मग मित्र पिऊन टाईट झालेल्या दिप्याला ढाब्यावरून घरी सोडेपर्यंत साहेब साहेब बोलत राहतात. दिप्या त्या वेळी मित्रांसाठी कितीही पैसे खर्च करायला तयार असतो. पण असा एखादाच दिवस त्याच्या आयुष्यात येतो. पुन्हा दुसर्या दिवशी सकाळी तो दिप्याच असतो.
दिप्याच्या घरात देवघरा एवढाच मोठा फोटो साहेबांचा आहे. आई सारखी बोलते जरा लग्नाचं बघ. पण दिप्याने ठरवून टाकलंय की साहेब मंत्री झाल्याशिवाय लग्न करायचं नाही. आईला त्यातलं कारण काही लक्षात आलं नव्हतं. दिप्याने तिला नीट समजवून सांगितलं की आज मी आमदाराचा पी ए आहे. उद्या साहेब मंत्री झाले की मंत्र्याचा पी ए म्हणून लोक ओळखणार. मग अजून चांगल्या घरची पोरगी सांगून येईल. दिप्या मोठ मोठी स्वप्न पहायचा. प्रत्येकजण पाहतो. पण दिप्या आपली स्वप्नं खरी व्हावीत म्हणून प्रामाणिकपणे कष्ट पण करायचा.
साहेबांच्या मतदारसंघात साहेबांची प्रतिमा जपली जावी म्हणून खूप राबायचा. पण साहेबांच्या बातम्या म्हणाव्या तशा लागत नाहीत याचा साहेबांना राग होता. जिल्ह्याचे पालकमंत्री रोज बातमीत असायचे. त्यांची सत्ता होती. सगळे पत्रकार पुढ पुढ करायचे. काही ना काही निमित्त करून पहिल्या पानावर पालकमंत्र्याचा फोटो यायचा. महिने महिने आमदार साहेब पहिल्या पानावर फोटो यावा म्हणून वाट बघायचे. निवडणूक जवळ येत चालली होती. पालकमंत्री साहेबांच्या विरोधातल्या उमेदवाराला जोरदार ताकद देणार होते. आता काहीतरी जबरदस्त कामिगिरी केली पाहिजे हे साहेबांच्या मनात होतं.
जिल्ह्यातल्या कायदा व सुव्यव्स्थेच्या प्रश्नावर आमदार साहेबांनी विधानसभेत आवाज उठवला होता. पण स्थानिक वर्तमानपत्रांनी साधी दखल सुद्धा घेतली नव्हती. खरंतर दरोडेखोरीच्या घटना वाढत चालल्या होत्या. लोकांच्या मनात भीती बसली होती. पण पालकमंत्र्यांच्या दहशतीमुळे बातम्या दडपून टाकल्या जायच्या. ह्या गोष्टीवर काय करावं याचा साहेब विचार करत होते. अचानक त्यांच्या डोक्यात आयडिया आली.
दिप्या साहेबांच्या सांगण्यावरून दोन अट्टल दरोडेखोरांना भेटला. त्यांचा नुकताच जामीन झाला होता. दिप्याने त्यांना योजना सांगितली. त्या दोघांनी नकार दिला. एकतर वर्षभर आत होते. आता कुठे जामीन झाला होता. आता पुन्हा दरोडा टाकायची त्यांची इच्छा नव्हती. दिप्याने साहेबाना फोन केला. साहेब त्यांना म्हणाले तुमचा जामीन रद्द करायला फार टाईम लागणार नाही मला. दरोडेखोरांना माहित होतं आमदार साहेबांच्या डोक्यात एकदा का एखादी गोष्ट गेली की मग काही खर नाही. दोघं तयार झाले. पण त्यांनी एक अट घातली. दिप्याने होकार दिला.
मध्यरात्री दिप्या दोघांना घेऊन पालकमंत्र्यांच्या फार्म हाउसवर गेला. दोघांनी तिजोरी फोडली. दिप्या बाहेर नजर ठेवून होता. दोघं माल घेऊन बाहेर आले. दार तोडून टाकलं होतं. सुरक्षा रक्षक बेशुद्ध केले होते. नासधूस केली होती. दिप्याने सगळे फोटो घेतले. पण निघताना घोळ झाला. कुत्रा मागं लागला. दरोडेखोर वेगात शेतात पळून गेले. दिप्याला काही जमलं नाही. दिप्याच्या पायाला कुत्रा कडकडून चावला. दिप्या ओरडू लागला.
तोपर्यंत शेजारचे लोक गोळा झाले. दिप्या रंगेहात पकडला गेला. दिप्याने दरोडेखोरांचे नावं सांगितले नाही. एकटाच जेलमध्ये गेला. आमदाराचा पीए चोर निघाला म्हणून बदनामी झाली. निवडणूक झाली. साहेब काही मंत्री झाले नाही. आमदार म्हणून निवडून आले. आता आमदार साहेबांनी नवीन उजवा हात ठेवला. आठवड्यात दोनदा दिप्याची आई आमदार साहेबाच्या ऑफिस बाहेर जाऊन बसते. दिप्याला सोडवायची काही हालचाल होते का बघायला. पण तेच आश्वासन मिळत जातं.
आजकाल आश्वासन काय भेट पण मिळत नाही. आमदार ऑफिस मधेच असतात. बाहेर बसलेल्या दिप्याच्या आईला आमदाराचा आवाज येतो. दिप्या. ती लगबगीने उठून आत डोकावते. पण साहेब आजकाल नवीन पी एला दिप्याच म्हणतात. त्यांना दिप्या नावाची सवय झालीय. आता दिप्याला पण जेलची सवय झालीय. दोन वर्ष झालेत. आई अजून वाट बघतेय. नवीन दिप्याची. तो सुद्धा कामात बुडून गेलाय. त्याला पण साहेब मंत्री होतील असे स्वप्न पडतात. साहेब पुन्हा पालकमंत्र्याच्या विरोधात काहीतरी जबरदस्त करायची योजना आखताहेत. दुर्दैव असं आहे की जुना दिप्या अजूनही साहेब मंत्री होण्याची वाट पाहतोय. आईला मात्र आता देवघराच्या बाजूला असलेले फोटोतले साहेब बघवत नाहीत. बोटं मोडून जातील तिचे एवढ्या वेळा बोटं मोडते दिवसभरात, साहेबाच्या फोटोला बघून.
Photo © clickr Sharad Patil
गोष्ट छोटी डोंगराएवढी E-Book Amazon Kindle वर उपलब्ध आहे.
Book Link :
https://amzn.to/3cQ9Uh4
0 Comments