प्रिय शिवाजी महाराज

February 17, 2018

लेखन

arvind jagapat patra

महाराज,

महाराज,

कसे आहात? निवडणुकीत सगळ्याच पक्षांनी तुम्हाला बिझी करून टाकलं. किती भुरट्या लोकांसोबत तुमचे फोटो लावले गेले. ज्यांनी शेतकरी पार रसातळाला नेला त्यांच्या व्यासपीठावर तुमचा फोटो. ज्यांना राज्याचेच तुकडे करायचेत त्यांच्या व्यासपीठावर तुमचा फोटो. निवडून आल्यावर हेच लोक दिल्ली- मुंबईतल्या आपल्या मालकांचे फोटो डोक्यावर घेऊन फिरणार. तेंव्हा तुमची आठवण होत नाही. कारण दिल्ली पुढे नतमस्तक होण्याची परंपरा. तुम्ही सह्याद्रीला आपलं राज्य मिळवून दिलं. पण काळाच्या ओघात हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा सह्याद्री कधी हिमालयाचे पाय दाबायला जाऊ लागला ते कळल नाही. तुम्ही आम्हाला स्वतः साठी स्वराज्यासाठी लढायला शिकवलं होतं. मावळ्यांना आपलं राज्य आहे याची जाणीव झाली होती. कित्येक वर्षात अशी जाणीव निर्माण झाली नव्हती. पण तुमच्यानंतर पुन्हा कधी आम्ही दिल्लीसाठी लढायला लागलो कळलच नाही. पानिपत असो किंवा १८५७ चा उठाव. आम्ही लढत होतो ते मात्र दिल्लीच्या तख्तासाठी. दिल्लीच्या राजासाठी. आणि ते तख्त आपलं वाटत नव्हतं. शेतकऱ्याला ती कायम परकी होती. अन्याय करणारी होती. तुमच्या राज्यानंतर कुठलंच राज्य आपलं वाटलं नाही महाराज. हे फक्त तुमचं कौतुक नाही. हे शेतकऱ्याच दुर्दैव जास्त आहे.

तुम्ही स्वतंत्र नाणं सुरु केलं. राजभाषा कोश निर्माण केला. आरमाराला प्रोत्साहन दिलं. गड किल्ले बनवले. पण कुठल्या गोष्टीला तुमचं नाव नाही. हे कसं जमलं महाराज तुम्हाला? अहो तुमचं स्मारक बनवायचं ठरलंय तर आजपर्यंत करोडो रुपये खर्च झालेत फक्त आम्ही बनवणार हे सांगायला. ते पूर्ण झाल्यावर स्मारकापेक्षा जाहिरातीचा खर्च जास्त झालेला असेल बहुतेक. गरीबाला घर दिलं सरकारी पैशातून तरी करोडोची जाहिरात करतात आजकाल. तुम्ही आम्हाला स्वराज्य मिळवून दिलं पण कुठे गाजावाजा केला नाही. इतिहास सुद्धा आता कुठे कळतोय आम्हाला. खराखुरा. लहानपणी वाटायचं तुम्हाला भवानी तलवार भेटली म्हणूनच तुम्ही एवढा पराक्रम करू शकले. आपल्याला पण अशी एक भवानी तलवार भेटली पाहिजे असं स्वप्न बघायचो. पण तलवारीने बोट कापून रक्ताचा अभिषेक घालतानाचे तुमचे फोटो बघितले की विचार बदलायचा. खूप वेळा हातात ब्लेड घेऊन बघितली पण हिंमत झाली नाही. एकदा चुकून बोट कापलं पेन्सिलला टोक करता करता तर देव शोधायला लागलो. तेवढाच अभिषेक होऊन जाईल परस्पर म्हणून. पण कुठलाच देव भेटला नाही. लहानपणी सुद्धा एवढे लबाड होतो आम्ही. पण नंतर कळल भवानी मातेचा किंवा कुठल्याही देवाचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतो ज्याच्या अंगी धाडस असत, लोककल्याणाची तळमळ असते. मुळात ज्याला समाजाच्या भल्याचा नाद असतो तो आशीर्वाद मागत फिरत नाही. असं कार्य करतो की जग त्याला आशीर्वाद देतं.

हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असं म्हणतो आम्ही अभिमानाने. ती तर असणारच. पण फक्त श्रींच्या इच्छेवर राज्य झालं असत तर घरोघरी शिवराय जन्मले असते. तसं होत नाही. देव आशीर्वाद घेण्यासाठी असतात पराक्रम स्वतःच करावा लागतो. हे राज्य व्हावे ही जिजाऊ आणि शहाजी राजांची पण इच्छा असावी लागते. आपल्या घरी शिवाजी जन्मावा असं आई वडलांना पण वाटायला हवं ना. मुलाच्या परीक्षेच्या काळात आठवडाभर सुट्टी काढली की आयुष्यभर कौतुक सांगणारे आई बाप खूप आहेत. पण मुलाला स्वराज्यनिर्मितीच्या कार्याला प्रेरणा देऊन आपलं आयुष्य त्याच्यासाठी समर्पित करणारी जिजाऊसारखी माता दुर्मिळ असते. परदेशात आपल्या पोराला नौकरी मिळावी म्हणून देव पाण्यात ठेवून बसणारा बाप कामाचा नसतो. शहाजी राजांसारखी दूरदृष्टी असावी लागते. मुलाला योग्य साथीदार, योग्य प्रांत आणि योग्य दिशा देण्यासाठी स्वतःला तेवढी जाण असावी लागते. महाराज तुम्हाला शहाजी राजे आणि जिजाऊ सारखे पालक भेटले हा सगळ्यात मोठा आशीर्वाद होता. नेमकी हीच गोष्ट आम्ही समजून घेत नाही. तुमचा इतिहास आम्हाला पाठ आहे पण शहाजी राजांची दूरदृष्टी आम्हाला नीट माहित नसते. जिजाऊचं योगदान आम्ही पुरेसं लक्षात घेत नाही. म्हणून लोकसंख्या सव्वाशे कोटी झाली तरी कुठल्याच घरात शिवराय जन्मत नाहीत. एक साधं निरीक्षण आहे आम्हाला अजून आई वडलांचं महत्वच कळलेलं नाही महाराज. जसं शहाजी राजे आणि जिजाऊ नसतील तर शिवरायांसारखा पराक्रमी राजा होऊ शकत नाही तसंच शिवरायांसारखा मातृ पितृ भक्त असल्याशिवाय आई वडलांचं स्वप्न पण पूर्ण होऊ शकत नाही.

महाराज तुमचा विचार नेहमी लढायांपुरता होतो. पण ज्या वयात शहाजी राजांनी तुम्हाला स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करायला पाठवलं, एवढी मोठी मोहीम सोपवली, आईवर सगळी जवाबदारी दिली त्या वयात तुम्ही काय विचार केला असेल? सुखं पायाशी लोळण घेत असतील ती सोडून आईसोबत एकट्याला यावं लागलं हे तुम्ही किती सहज समजवून घेतलं. खेळण्या बागडण्याच्या वयात सवंगडी गोळा करून युद्धाचा सगळ्यात प्रभावी प्रकार शोधून काढला. इथे मुलांना झोपेतून जागं करायला अर्धा तास लागतो. तुमच्यात स्वराज्याची प्रेरणा किती सहज जागृत झाली. चार पोरं गोळा झाली की अर्ध्या भांडणं होतात. तुम्ही मावळे गोळा करून एवढी वर्ष शत्रूशी लढाया केल्या. कुठून आली ही एकी? साधी निवडणूक लढायची झाली तर पैसे देऊन लोक गोळा करावे लागतात. तुम्ही जीवन मरणाच्या खऱ्या खुऱ्या लढाईत जीवावर उदार होणारे मावळे कसे गोळा केले? कुठल्याची मोबदल्याशिवाय तुमच्या जीवाला जीव देणारी एवढी माणसं कशी गोळा झाली? सभेला सुद्धा पैसे देऊन माणसं गोळा केली जातात. तुम्ही तोफेचा सामना करायला माणसं गोळा केली. ती सुद्धा तरुणपणी. राजकारणात आयुष्य गेलेल्या, सत्तेत वर्षानुवर्ष राहिलेल्या लोकांना सुद्धा आश्वासनांची खैरात करावी लागते माणसं जमवायला. तुम्ही केवळ स्वराज्य या ध्येयासाठी एवढी निष्ठावंत मंडळी कशी जमवली? चांगल्या नेत्यांना दिल्लीत पायाशी लोळण घेताना पाहतो आम्ही नेत्यांच्या. तुम्ही औरंगजेबाला त्याच्याच दरबारात पाठ दाखवून आलात. महाराज कुठून एवढ साहस यायचं तुमच्यात? आणि आम्ही तुमचेच वारस आहोत ना? आमच्यात वारसाने काहीच आलं नाही म्हणजे. आज बापाला म्हातारा आणि नेत्याला साहेब म्हणणारी पिढी कशी निर्माण झाली? आज आमच्यात एकी असती तर दिल्लीचे तख्त राखतो मराठी असं म्हणायची वेळ आली नसती. दिल्लीवर राज्य करतो मराठी असं म्हणता आलं असत. अर्थात दिल्लीवर राज्य करायचं हेच काही स्वप्न नाही. पण शेतीतल्या पिकाला हमीभाव मिळावा एवढच स्वप्न पाहिलं आम्ही एवढी वर्ष. अजूनही ते स्वप्न पूर्ण होत नाही. म्हणून एवढी वर्ष झाली महाराज राजा असावा तर शिवरायांसारखा असं आम्ही म्हणत आलो. अजून कुठला नेता आम्हाला आमचा वाटला नाही. पुन्हा कुणी शेतकऱ्याचा वाली जन्माला आला नाही. म्हणून एवढ्या वर्षानंतरही तुमच्या जयंतीचं आम्हाला एवढ कौतुक आहे.

राजकीय पक्षांच्या भुरट्या लोकांसोबत तुमचे फोटो बघितले की खूप त्रास होतो महाराज. तुमच्या फोटोचा वापर सगळे राजकीय पक्ष करतात. तुमच्या विचारांचा वापर मात्र कुणी करत नाही. तुम्ही नेहमी आपल्या रयतेला शत्रूपासून, संकटांपासून दूर ठेवलं. आज आम्ही तुम्हाला प्रत्येक राजकीय पक्षात असलेल्या शत्रूपासून कसं दूर ठेवावं याचा विचार करतोय. तुम्ही कुठल्या पक्षाचे, जातीचे किंवा धर्माचे नाही. तुम्ही रयतेचे राजे आहात. म्हणून हे असे राज्य आणि असे राजे पुन्हा व्हावेत ही प्रत्येक देवाचीच नाही तर प्रत्येक धर्माची, प्रत्येक माणसाची इच्छा असेल. महाराज, तुमचे आशीर्वाद आहेतच म्हणून टिकून आहोत. पण जमल्यास थोडाफार स्वाभिमान द्या. ह्या आसमानी – सुलतानी संकटात शेतकऱ्याला जगण्याचं बळ द्या.

अरविंद जगताप.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *