एकेकाळची संसद

30 May 2025

आपल्या देशाने नवीन संसद बनवली. म्हणजे नवी इमारत. आधीची जुनी इमारत तशीच आहे. ती इंग्रजांनी बनवलेली. खरतर व्हाइसरॉयसाठी बंगला बांधायचा होता. पण दरम्यान भारताला असेम्ब्ली पण मंजूर केली इंग्लंडने. मग ठरलं संसदेची इमारत पण बांधा . आपण सारखं दिल्लीत ल्यूटन नाव ऐकतो. तर तो ल्यूटन आणि आणखी एक जण आर्किटेक्ट होते. तेंव्हा दोन्ही सभागृहाचे दोनेकशे सभासद असतील. पण इंग्रजांनी भविष्याचा विचार केला असेल. पुढे हे सहाशे पर्यंत जातील खासदार असा त्यांना अंदाज आला असेल. म्हणून मोठे हॉल बनवले. दिल्लीत जाऊन आपण जे राष्ट्रपती भवन बघायला जातो ते व्हाइसरॉयसाठी बनवल इंग्रजी लोकांनी. भव्यदिव्य. परिसर बघूनच प्रेमात पडावं. पण बघणाऱ्या माणसाला ते बघताना गुलामीची आठवण होणारच. देश स्वतंत्र झाला. आपली संसद. आपले खासदार. आपली लोकसभा. आपली राज्यसभा. जिथे घटना लिहिली तो सेंट्रल हॉल. त्या सेंट्रल हॉलच्या प्रवेशद्वारावर अरबी भाषेतला एक सुविचार आहे.

लोकांनी आपण होऊन बदल घडवून आणल्याशिवाय सर्वशक्तिमान परमेश्वर त्यांच्या स्थितीत बदल करणार नाही. “

हे सगळं नंतर आपल्या लोकांनी लिहून घेतलं. आदर्श राज्यकारभार केला जावा म्हणून. जुन्या  संसदेत एका ठिकाणी,” हा आपला, हा परका, हा विचार क्षुद्र मन असणाऱ्यांचा असतो. ज्यांची वागणूक उदार आहे अशांना जग हे स्वतःचे कुटुंबच वाटते.” असा आशय असलेला विचार लिहिलेला आहे

एका ठिकाणी महाभारतातला श्लोक आहे. त्याचा अर्थ काहीसा असा, ती सभाच नव्हे की जेथे वृद्ध असत नाहीत, ते वृद्ध नव्हेत की जे धर्मचर्चा करीत नाहीत, तो धर्म नव्हे की, ज्यात सत्य नाही, ते सत्य नव्हे की, ज्याने लबाडीचा आश्रय घेतला आहे. 

आता या गोष्टी आपल्या लोकसभेत लिहून तर घेतल्या होत्या. पण आचरण? असोलिहून तर खूप काही ठेवलं होतं. एका ठिकाणी लिहिलयराज्यकर्ता नेहमी जागृत बुद्धीने वागणारा असावा. त्याने कधीही स्वतःच्याच बुद्धीने वागू नये. त्याने आपल्यासारख्याच अधिकाऱ्यांवर सर्व विषय सोपवावेत त्यांना त्याने लोकसभेत घेऊन बसावे त्यांच्या योग्य सल्ल्याने  चालावे.

                      आपण लोकसभेत पंतप्रधान मोदी आल्यावर भाजपवाले उभे राहून जो जल्लोष करतात तो टिव्हीवर पाहतो. आधी अशी पद्धत नव्हती. मान अध्यक्षाला. अध्यक्ष आल्यावर खासदार उभे राहतात. अर्थात ही पद्धत इंग्रजांनीच सुरू केलेली. त्यांची कारणही वेगळी . इंग्लंडमध्ये पूर्वी त्यांच्या मंदिरात संसद व्हायची. मग पाया पडण आलच. त्यात खासदाराला शपथ घेणं कम्पल्सरी. इंग्लंडमध्ये बायबलवर हात ठेऊन शपथ घ्यावी लागायची. तर त्यांच्याकडच्या एक दोन नास्तिक लोकांनी नकार दिला. मग त्याची खासदारकी रद्द झाली. पण पठ्ठे बायबल वर हात ठेवायला तयार झाले नाहीत. इंग्रजांनी बनवलेले काही नियम बरेच कामी आले म्हणावं लागेल. उदाहरणार्थ कुणाही खासदाराने बसून बोलायचं नाही. नाहीतर आपल्याकडे ज्या वयाचे खासदार जातात ते उभेच राहिले नसते कधी. नियम तर एक खासदार बोलत असताना दुसऱ्याने बोलू नये असाही आहे. पण आपल्याकडे तो पाळण्याची गरज कुणालाच वाटत नाही. ताराबाई साठे नावाच्या एक जुन्या खासदार. त्यांनी काही आठवणी लिहिल्या आहेत. त्यात त्यांनी लिहिलं की सभागृहात महिला सदस्यांनी विणकाम करू नये असाही नियम आहे. चर्चेत लक्ष देण्यासाठी असे काही नियम बनलेत. आणखी काही आठवणी पण महत्त्वाच्या आहेत.

                              आज पुन्हा हुंडा हा प्रश्न चर्चेला आलाय. पण आपल्या लोकसभेने १९५९ साली हुंडा विरोधी विधेयक  मंजूर केलं. विधेयक पुन्हा  राज्य- सभेकडे पाठवलं जातं. तसं ते राज्यसभेत मंजुरीसाठी गेलं . त्यात राज्यसभेने काही सूचना करून ते परत पाठव. पण लोकसभेने राज्यसभेच्या सूचना नामंजूर केल्या. दोनही सभागृहांचे एकमत होणे कठीण दिसताच राष्ट्रपती श्री. राजेंद्रबाबूंनी दोनही सभागृहांची संयुक्त बैठक मे मे १९६१ रोजी घेतली. राज्यसभेची सूचना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे हुंडा घेता येऊ नये अशी पोक्त विचारांती होती ती लोकसभेने मान्य केली. परंतु हुंडा घेतल्यास हुंडा घेणाऱ्यास शिक्षा व्हावी या गोष्टीला  राज्यसभेची संमती नव्हती. पण लोकसभेचा यावर फारच कटाक्ष होता. संयुक्त बैठकीत लोकसभेचे बहुमत झाल्याने ते राज्यसभेस मान्य करावे लागले आणि  आजचे हुंड्याचे विधेयक मान्य झाले. पण हुंडा घेणाऱ्यांना शिक्षा करू नये हे राज्यभेच मत होतं हे वाचताना आता हैराण होतो आपण

                                 युद्धाचा काळ संसदेने तेंव्हाही पाहिला. चीन युद्ध असो किंवा पाकिस्तान युद्ध असो. तेंव्हा देश म्हणून आपली आर्थिक परिस्थिती फार बरी नव्हती. पण लोकांनी युद्धाला नुसता तोंडी पाठिंबा दिला नव्हता. लोकांनी पैसे गोळा केले. सोने दिले. सभागृहात खासदारांनी सोने दिले. निधी दिला. पंडित नेहरुंना जे हार घातले जायचे ते खासदार पाच पाच हजार रुपयांची बोली लावून विकत घेत. युद्धाला देणगी देत. देश म्हणून फक्त चर्चा आणि आरोप यापलीकडे काही जवाबदारी असते हे ती संसद दाखवून द्यायची. भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यावर राजीनामा मागायच्या आधी स्वतःहून राजीनामा देणारे मंत्री होते. सरकारशी मतभेद आहेत म्हणून मंत्रिपदाला लाथ मारणारे मंत्री होते. स्वाभिमान आणि कणा असलेले लोक होते. हळूहळू संसद बोफोर्स, हर्षद मेहता, टू जी, अदानी अशा विषयाने गाजू लागली. व्यापारधर्म मोठा झाला. युद्धात वापरलेल्या स्लोगनचे पेटंट मागण्याएवढी व्यापारी लोकांची मजल गेली. देशाच्या मोहिमेवर शंका घेण्याएवढी विरोधकांची पातळी घसरली. आणि देशाच्या परराष्ट्र सचिवाला देशद्रोही, हुतात्मा झालेल्या सैनिकाच्या बायकोला चारित्र्यहीन ठरवणारी जनता दिसून आली. तर लष्करी अधिकारी असलेल्या महिलेला पाकिस्तानी ठरवण्या पर्यंत सत्ताधारी वाया गेले. ज्याला त्याला युद्धाच्या नावाने आपलं चॅनल, आपली वाहिनी चालवायची पडली. अर्थात या चढाओढीची सुरुवात संसदेपासून  झाली. युद्धाच्या काळात कितीतरी  खासदार ज्या पद्धतीने बोलत होते ते पाहून लोकांना त्यांची कीव करावी वाटली. कारण गरीब लोकांच्या कल्याणासाठी असलेल्या इमारती व्यापाऱ्यांनी गजबजू लागल्या

                      शक्तीने मिळती राज्यें युक्तीने यत्न होतसे शक्ति युक्ति जये ठायीं तेथें श्रीमंत धांवती।

Tags

तुम्हाला काय वाटतं?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचण्यासारखे...