अरे चोरा!

11 May 2022

२३ तारखेची गोष्ट. सोमवारची. दुपारचे बारा वाजलेले. वसंतराव बारकाईने सीसीटीव्ही बघत होते. एक लाल रंगाचा शर्ट घातलेला मुलगा जाताना दिसत होता. साधारण बारा तेरा वर्षाचा असावा. इमारतीच्या आवारात आंब्याचं झाड होतं. तो मुलगा थोडा पुढे जाऊन परत माघारी फिरला. त्याने असं मुद्दाम केलं होतं. गेटच्या आत डोकावून कुणी बघत नाही याची खात्री करून घेतली होती. आता तो जवळ असलेल्या एका काठीने झाडाला लागलेल्या कैऱ्या पडायचा प्रयत्न करू लागला.

साधारण दहा मिनिट अथक प्रयत्न करूनही त्याला एकही कैरी पाडण्यात यश आलं नाही. त्याचा चेहरा कैरीपेक्षा आंबट झाला असावा. अर्थात तेवढ क्लीअर सीसीटीव्ही मध्ये दिसत नव्हतं. पण त्या मुलाला निराश होऊन सुस्कारा सोडायची संधी मिळाली नाही. अचानक तो घाईत निघून गेला. कदाचित इमारतीतून कुणी बाहेर पडण्याचा आवाज झाला असावा. पण वसंतरावाना अपेक्षित असलेला चोर तो नव्हता. अर्थात त्यांना फार वेळ वाट बघावी लागली नाही. एक पैलवानासारखा दिसणारा तरुण तिथून जाताना दिसला. चालता चालता थांबला. काही वेळ इकडे तिकडे बघत राहिला.

मग त्याने खिशातून फोन काढला. एक दोन रिंग गेल्या असतील कदाचित. लगेच समोरून फोन उचलला गेला असणार. काही वेळ तो तरुण फोनवर बोलत राहिला. साधारण आपण कुणाची तरी वाट पाहताना उशिरा येणाऱ्या माणसाशी बोलतो तसे हातवारे आणि हावभाव वाटले त्याचे. वसंतराव त्याच्या हालचालीकडे बारकाईने बघत होते. चार पाच सेकंद सीसीटीव्हीत काहीच दिसेनासं झालं त्यामुळे वसंतराव अस्वस्थ झाले.

खूप वेळ झाला आपण चहाच घेतला नाही असं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी कपाची दांडी धरून चहाचा एक घोट घेतला आणि त्यांचा चेहरा साफ पडला. चहा न घेऊन चांगले पंधरा मिनिट झाले हे त्यांना लक्षात आल. सीसीटीव्ही वर वेळ दिसत होती. अर्थात चहा थंड झाल्याची निराशा फार काळ टिकली नाही. सीसीटीव्ही पुन्हा सुरु झाला. फोनवर बोलणारा तरुण आता भिंतीला टेकून उभा राहिला होता. थोड्या वेळात त्याचही लक्ष कैऱ्याकडे गेलं. खुपदा कैरी न आवडणारे लोकही कैरी दिसली की जरा थबकतात. कैरी पाडण्याचा मोह भल्या भल्यांना होतो.

पण हे भलते विचार करण्याची ही वेळ नव्हती. आणी तो तरुण काही कैरी पाडताना दिसत नव्हता.तो एकटक बघत राहिला. त्याच्या मनात काय चालू आहे याचा काहीच अंदाज येत नव्हता. गुन्हेगार थंड डोक्याचे असतात हे वसंतरावाना माहित होतं. अर्थात सिनेमामुळे. त्यांनी हजार एक तरी सिनेमे बघितले असतील. आणि त्यातले नऊशे क्राईमवाले असतील. गुन्हेगारीची त्यांना आवड होती असं नाही. उलट त्यांना असे सिनेमे बघून भीती वाटायची. पण ते एक व्यसन झालं होतं त्यांचं.

तर तो तरुण आता पुन्हा फोनवर बोलत होता. पुन्हा तसेच हातवारे. तो गुन्ह्यातला आपला साथीदार यायची वाट बघत असल्यासारखा दिसत होता. पण थोड्याच वेळात एक तरुणी तिथे आली. ती रिक्षात होती. तिने तोंडाला रुमाल लावलेला होता. ती रिक्षातून बाहेर एकदाच डोकावली. तेवढीच काय ती तिची झलक. तरुण लगेचच रिक्षात बसला. रिक्षा निघून गेली. वसंतराव ज्याची वाट बघत होते तो चोर हा पण नव्हता. वसंतराव निराश झाले.

खूप वेळ नुसती भिंत दिसत राहिली सीसीटीव्हीत. काहीच हालचाल नाही. वाऱ्याची एखादी झुळूक आली की पानांची हालचाल व्हायची. बाकी काही नाही. खरतर एरव्ही वसंतरावना झोप लागली असती. किंवा त्यांनी पुन्हा सिनेमा सुरु केला असता. पण आज चोर येणार होता याची त्यांना खात्री होती. आणि त्यांनी ठरवून टाकलं होतं की चोर आत आला की लपून बसायचं. चोर काय करतो ते बघत रहायचं. खूप वेळ असा खेळ खेळायचा होता त्यांना.

खूप वेळ चोराच्या हालचाली टिपायच्या होत्या. त्यामुळे ते सावध होते. चोराची वाट पाहणारा माणूस किती कमालीचा असेल. वसंतराव तसेच आहेत. ते टूथ पेस्ट वाया जाऊ नये म्हणून त्याला पार कुटून कुटून काढतात. त्यातली शेवटची पेस्ट वापरून घेतात. खोबऱ्याच्या तेलाची बाटली कापून त्यातलं पण तेल डोक्याला लावतात. पेपर विकत घेत नाहीत. वाचनालयात जाऊन वाचतात. आणि या सगळ्या गोष्टीसाठी ते चिडचिड करत नाहीत.

आपली काटकसर ते एन्जॉय करतात. दिवसभरात आपण एखाद रुपया वाचवला तरी त्यांना प्रचंड आनंद होतो. आणि आनंदी चेहऱ्याने ते झोपी जातात. पण आज झोप येणार नव्हती. चोर कधीही येऊ शकला असता. आताही एक बाईक थांबलेली दिसत होती. बाईकवर दोघे होते. त्यातला मागे बसलेला उतरला. चांगले दोन तीन मिनिट दोघे बोलत राहिले. मग बाईकवाला निघून गेला. उतरलेला पंचविशीतला तरुण उभा राहिला. काही वेळाने त्याला उन्हाचा त्रास होऊ लागला म्हणून तो झाडाखाली येऊन उभा राहिला. त्या गल्लीत ते एकमेव झाड. त्यामुळे दिवसभर कुणी न कुणी झाडाखाली उभं असायचं.

एक मोठी फांदी भिंतीला फोडून बाहेर आल्यासारखी आली होती. खरतर फांदी आधीची. भिंत नंतर बांधलेली. तर त्या फांदीला हात धरून लोक उभे रहायचे. गल्लीतले पोरं त्या फांदीवर चढायचा प्रयत्न करायचे. पण ते तेवढ सोपं नव्हतं. शेजारच्या बंगल्यातला कुत्रा लगेच जोरजोरात भुंकायचा. म्हणून सहसा कुणी त्या वाटेला जायचं नाही. तर तो तरुण आता झाडाखाली उभा होता. त्याने आपले हेडफोन कानाला लावले. कदाचित तो गाणं ऐकत असावा. पण असा अचानक सावलीत उभा राहून गाणं ऐकण्याचा त्याचा काय उद्देश असावा? खुपदा लोक आपल्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी कुठली तरी प्रार्थना किंवा मंत्र म्हणतात किंवा ऐकतात.

पण चोर असं करत नसावा. बहुतेक तो तरुण वेळ घालवायला गाणं ऐकत असेल. गाणं ही खरतर आवड असते. वेळ घालवायची गोष्ट नसते. आणि माणसाने काही वेळ तरी विचार करण्यासाठी राखून ठेवला पाहिजे. किंवा राखून नाही ठेवला तरी असा जो मोकळा वेळ मिळतो त्यात विचार केला पाहिजे. नाहीतर मिळाली संधी की लाव हेडफोन कानाला. असं केल्यावर आपला विचार कधी करणार? आपल्या माणसाचा विचार कधी करणार? वसंतराव विचार करत होते.

तो तरुण निघून गेला होता. आता फक्त भिंत दिसत होती. पण वसंतराव विचारात मग्न होते. दिवसभर त्यांचं सीसीटीव्ही कडे लक्ष होतं. आता दिवसभरात दहाव्या वेळी त्यांना चहा प्यायची आठवण झाली. रात्रीचे बारा वाजून गेले होते. तेवीस तारीख संपून चोवीस तारीख चालू झाली होती. आजही अन्वय आला नाही. मागच्या वाढदिवसालाही आला नव्हता. वसंतराव आज सत्त्याहत्तर वर्षांचे झाले. अन्वय त्यांचा एकुलता एक मुलगा. वसंतराव त्याला लाडाने अरे चोरा म्हणायचे.

अन्वय त्यांच्या नकळत त्यांची बाईक चोरून शिकला. कार पण अशीच चोरून शिकला. कॅनडाला पण असाच न सांगता गेला. म्हणजे काही महिन्यासाठी जातो म्हणाला आणि कायमचा स्थाईक झाला. वसंतरावना वाटतं असाच न सांगता येईल. चोरून येईल. वाढदिवसाला तरी नक्की येईल. चार वर्ष झाली. वसंतराव दर वाढदिवसाला एकटक सीसीटीव्ही बघत असतात. एकाच आशेवर की आपला लाडका चोर येईल आणि आपण लपून बसू. आणि मोठ्याने म्हणू, अरे चोरा!

Tags

तुम्हाला काय वाटतं?

What do you think?

1 Comment
28 November 2022

very touching …hats off to you sir

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचण्यासारखे...