आयुष्यात एकदातरी कविता लिहिली नाही अशी माणसं फार कमी असतात.
आयुष्यात एकदातरी कविता लिहिली नाही अशी माणसं फार कमी असतात. वहीच्या शेवटच्या पानावर शब्दांची जुळवाजुळव केलेली असतेच आपण. ते शेवटच्या पानावरचे शब्द आयुष्यभर लक्षात राहतात. खारे वारे, मतलई वारे, संपृक्त द्रावण, मूलद्रव्य वगैरे मागे पडत जातात. सोबत राहतात आपल्याच ओळी. खूप वेळा फोटो लावलेले असायचे वर्तमानपत्रातून काढून. नट्यांचे, क्रिकेटपटूचे. किती निरागस होतो आपण. कोण कुठली नेपाळची मनीषा कोईराला, जर्मनीची स्टेफी ग्राफ, अमेरिकेतली मेरलिन मन्रो असे कुणाकुणाचे फोटो असायचे सगळ्यांच्या वहीत. पण हळूहळू कवितेतून, बोलण्यातून, जगण्यातून प्रेम अलगद गायब झालं. आधी अवतीभवती असलेलं राजकारण फक्त निवडणुकीच्या काळात समोर यायचं. प्रचारासाठी मटका कुल्फीच्या बोलीवर पोरं गल्लीत घोषणा देत फिरायचे. आपण कुणाचा प्रचार करतोय याचं भानच नसायचं. फक्त कुल्फी महत्वाची होती. वर्तमानपत्र हातात घेतलं की शेवटच्या पानावरच्या क्रिकेटच्या बातम्या वाचायची सवय जाऊन हळूहळू आपण पहिल्या पानावर अडकून पडलो. राजकारणात. किंवा प्रत्येक गोष्टीतलं राजकारण कळायला लागलं हे खूप वाईट झालं.
शेकोटी पेटवलेली असायची. ज्याला शेकत बसायचं त्याने स्वतःचा काहीतरी वाटा आणायचा सोबत. जाळायला काहीतरी लाकूड, पाचोळा, काड्या असं काही.. खूप ठिकाणी या गोष्टीला शेकोटीसाठी सासू आणा असं म्हणतात. चहाच्या हॉटेलवर माणसं बसलेली असतात. सकाळपासून. पेपरमधला शब्द न शब्द वाचून काढलेला असतो. येणाऱ्या जाणार्या लोकांशी तावातावाने चर्चा चालू असते. कोणता पक्ष चांगला, कोणता नेता चांगला यावर गावोगाव भांडण. या निवडणुकीच्या काळात रंगणारया गोष्टी आता सोशल मिडिया आल्यापासून बारा महिने चालू असतात. प्रचारासाठी पाच वर्षात एकदा राबणारी पोरं आता चोवीस तास सोशल मिडीयावर कुणाचा ना कुणाचा प्रचार करत असतात. जत्रेत किंवा प्रचारात दिसणारे नेत्याचे फोटो आता रोज कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात होर्डिंगच्या रुपात दिसत असतात. मुतारीवर पण अमक्या नेत्याच्या सौजन्याने असा बोर्ड असतो. गटारी पण कुणा कार्यक्षम नेत्यांच्या कृपेने बनतात हे बोर्ड वाचल्यावर कळतं. आमदार असो किंवा नगरसेवक, सतत लोकांच्या गराड्यात असतो. काम तर फार काही घडताना दिसत नाही. मग या लोकांभोवती सदैव गर्दी करून असणारे लोक कोण असतात? या माणसांबद्दल नेहमी कुतूहल वाटत आलं. एकेकाळी कार्यकर्त्यांच्या गर्दीत असणारे नेते अचानक चमच्यांच्या गर्दीत अडकत गेले. पुढाऱ्याच्या मागे पुढे फिरून आयुष्याचं भलं होणार हे कधीपासून वाटू लागलं लोकांना? कारण एखाद्या विचारधारेशी प्रामाणिक राहून आयुष्यभर हलाखीत जगलेले, कायम विरोधी पक्षात राहिलेले पण कधीही पक्षांतराचा विचार सुद्धा न शिवलेले हजारो लोक आपण पाहिले. पण आता असे तत्व आणि निष्ठेसाठी आयुष्य पणाला लावणारे लोक दिसत नाहीत. कायम दुसरीकडे उडी मारण्याच्या पवित्र्यात असलेली बेडकं कशी दिसतात तसे खूप राजकारणी दिसतात. अशावेळी प्रामाणिकपणे एखाद्या नेत्यासाठी, पक्षासाठी, विचारसरणीसाठी आयुष्य वेचलेले लोक हटकून आठवतात. असे लोक होते हे आता सांगूनसुद्धा पटत नाही. पण आपण प्रेमात पडलो होतो त्यांच्या त्यागाच्या. त्यांच्या निष्ठेच्या. त्यांच्या शोकांतिकेची वेदना आपणही अनुभवली. म्हणून आपल्या कवितेचा भाग बनले हे लोक नकळत. आणि मी लिहून गेलो…
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?
आपल्या नेत्याला विजयाचा गुलाल लागत नाही तोपर्यंत चप्पल न घालण्याची शपथ घेतलेला तरुण, त्याच्या म्हातारपणी त्याची इच्छा पूर्ण झाली. कार्यकर्ता कसा असावा तर असा म्हणून त्याचं नेहमी कौतुक करणारा नेता विजयी झाला. मिरवणूक निघाली. पण आयुष्यभर अनवाणी राहिलेला तो तरुण गर्दीत हरवून गेला होता. आपला नेता विजयी झाला म्हणून त्याने वीस वर्षात पहिल्यांदा पायात चप्पल घालून पाहिली. पण आता ती चप्पलच त्याला जास्त टोचू लागली होती. विजयी सभेत नेत्याने त्याचा उल्लेख सुद्धा केला नाही हे ऐकून आपला जन्म अनवाणी राहण्यासाठीच झालाय हे त्याला कळून चुकलं होतं.
आजवर ज्यांची वाहिली पालखी भलताच त्यांचा देव होता,
पुरे झाली आता उगा माथेफोडी दगडात माझा जीव होता…
आपला भवताल आपल्या लिखाणात येतच असतो. कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणं लिहिताना वेगळं काही सुचायची गरजच नव्हती. अवधूत गुप्ते यांनी झेंडा चित्रपटासाठी लिहायला सांगितलं होतं. आम्ही आधीही एक गाणं केलं. पण तेव्हाच गुप्तेंच्या लक्षात आलं की मी काही मीटरवर लिहिणारा गीतकार नाही. मुळात मी गीतकारच नाही. कविता लिहू शकतो कधीतरी. तशीच एक कविता लिहिली आणी गुप्तेंच्या हातात टेकवली. त्यांनी तिचं सोनं केलं. आपल्याला जे म्हणायचंय तसच काही संगीतदिग्दर्शकालाही म्हणायचं असलं की सूर जरा जास्तच जुळून येतात. आणी अगदी पोटतिडकीने गाणारा ज्ञानेश्वर मेश्रामचा आवाज प्रत्येक कार्यकर्त्याचा वाटू लागतो. मी आजवर पाहिलेल्या कार्यकर्त्यांच्या वेदना मांडत गेलो फक्त.
जगण्याच्या वारीत मिळेना वाट
साचले मोहाचे धुके घनदाट
आपली माणसं आपलीच नाती
तरी कळपाची मेंढरास भीती
विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती
हा झेंडा आपल्याला सापडत नाही. राजकीय झेंड्यांची गर्दी झालेली असते. सगळे जग बदलण्याच्या वल्गना करत असतात. पण वर्षानुवर्ष करोडो लोकांच साधं जगणं सुद्धा बदलत नाही. पक्षकार्यासाठी लग्न न केलेले, नौकरी धंदा न करता राबलेले, स्वतःच्या पैशाने पायाला भिंगरी लावल्यासारखे पक्ष विस्तारासाठी गावोगाव फिरणारे असे कितीतरी लोक आपण बघितले. इतिहास फक्त नेत्यांचा लिहिला गेला. लिहिला जातो. कार्यकर्ता कुणाच्या आठवणीतही रहात नाही. दिन्या त्याच्या साहेबांसाठी खूप राबला. खाजगी कंपनीत कामाला होता. प्रचारासाठी महिनाभर दांड्या मारल्या कंपनीत. साहेब निवडून आले. दिन्याला कंपनीने कामावरून काढून टाकलं. निदान तीन चार महिन्याचा बाकी असलेला पगार साहेबांनी मिळवून द्यावा म्हणून दिन्या पाच सहा महिने आमदार साहेबाना भेटत राहिला. एक दिवस आमदार साहेब विधानसभेत पगारावर बोलले. दिन्याने पेपर विकत घेऊन वाचला. पण त्याच्या नाही आमदार साहेब आमदारांची पगारवाढ व्हावी म्हणून बोलले. त्यादिवशी पासून दिन्या पुन्हा साहेबांकडे गेला नाही. घरातच बसून असतो. एकटाच.
बूजगावण्यागत व्यर्थ हे जगणं उभ्या उभ्या संपून जाई
खळं रितं रितं माझं बघुनी उमगलं कुंपण इथं शेत खाई
अशा असंख्य गोष्टी आपण पाहिलेल्या असतात. लाखो माणसं भावी सरपंच किंवा भावी आमदार म्हणून ओळखले जातात. पक्षासाठी, साहेबानी दिलेल्या शब्दासाठी राब राब राबतात. असे अनेक भावी आमदार म्हणून वापरले गेलेले कार्यकर्ते फक्त विनोदाचा विषय होतात. बातमीचा विषय होत नाहीत. खरतर या लोकांना वापरून, या लोकांच्या कष्टाने नेते घडत असतात. मंत्री बनत असतात. कधी यांना डावा हात किंवा उजवा हात म्हणतात. कधी कार्यकर्ता. कधी चमचा. कधी पंटर. आजकाल तर भक्त पण म्हणतात एकमेकांच्या कार्यकर्त्यांना. कुठलाही शब्द वापरला तरी व्यथा बदलत नाही. मोठ्या झालेल्या नेत्यांची संख्या माहित आहे. पण कार्यकर्त्यांची संख्या किती आहे? गुत्तेदार, ठेकेदार मोठे होतात नेत्यासोबत. कार्यकर्ते अडगळीत पडतात. असं का होतं? कार्यकर्त्याने गरीब राहण्यातच नेत्याचा मोठेपणा दडलेला असतो. एवढ असूनही कार्यकर्ते एकमेकात भांडत राहतात. शिवीगाळ करत राहतात. एक दिवस ज्याच्यासाठी आपण समोरच्याला शिव्या देतोय, भांडतोय तोच उडी मारून दुसर्या पक्षात जातो. रातोरात नेता झेंडा बदलतो. कार्यकर्त्याला तेवढ सोपं नसतं झेंडा बदलणं. त्याने गाडीवर रंगवलेला असतो झेंडा. कपड्यावर, पेनवर, सोशल मिडीयावर असतो झेंडा. ते सगळं बदलायला खूप अवघड जातं. ज्यांच्याशी उभा दावा मांडला त्यांच्या मांडीला मांडी लावून एका मंडपात घोषणा देत बसायचं एवढ सोपं नसतं.
भक्ताच्या कपाळी सारखीच माती
तरी झेंडे वेगळे, वेगळ्या जाती
सत्तेचीच भक्ती सत्तेचीच प्रीती
विठ्ठला .. कोणता झेंडा घेऊ हाती
नेत्यांना पडत नाही. पण कार्यकर्त्यांना हा प्रश्न पडतो. तरीही काहीतरी चमत्कार होईल, बदल होईल या आशेने तो नेत्याला साथ देत असतो. भाषणाला भुलत असतो. साहेबासोबत असलेल्या फोटोवर खुश होत असतो. साहेबांनी दिलेली शाबासकी त्याला आयुष्यभर उर्जा देत असते राबायला. खूप कार्यकर्ते असे असतात ज्यांनी फक्त चितेवर विश्रांती घेतलेली असते. प्रकाश तसाच होता. साहेबांसोबत सगळ्या लग्नात, मौतीत प्रकाश असणार म्हणजे असणार. पण प्रकाश वारला त्या दिवशी साहेबाना त्याच्या मौतीला जाता आलं नाही. प्रकाश गेला याचं कुणाला वाईट वाटलं नाही तेवढ साहेब आले नाही याचं वाईट वाटलं. साहेब येऊ शकत नव्हते. त्यांच्या नव्या बंगल्यात पूजा होती. घरचे म्हणाले मौतीला गेलात तर खोळंबा होईल. प्रकाशची चिता जळत राहिली. त्याच्या प्रकाशात काही कार्यकर्ते दिसत होते. आता ते भानावर येतील आणि साहेबांचा नाद सोडतील असं वाटत होतं. पण चितेत जळता जळता प्रकाश त्यांच्या गप्पा ऐकत होता. ते आता साहेबांच्या आणखी जवळ जायचा, प्रकाशची जागा मिळवायचा प्रयत्न करणार होते. आवाज झाला. प्रकाशची कवटी जरा लवकरच फुटली.
उजळावा दिवा म्हणूनिया किती मुक्या बिचार्या जळती वाती
वैरी कोण आहे इथे कोण साथी
विठ्ठला .. कोणता झेंडा घेऊ हाती
– अरविंद जगताप.
0 Comments